Patanjali Yogpeeth : पतंजलीला 30 वर्ष पूर्ण, रामदेव बाबा यांनी पंचक्रांती मांडली; पुढील वर्षांचं प्लॅनिंग सांगितलं
Patanjali Yogpeeth : बाबा रामदेव यांच्या पतंजली या संस्थेने 30 वर्षे पूर्ण केली आहेत.
Patanjali Yogpeeth : पतंजलीने तीस वर्षांचा टप्पा गाठत असताना आता नवा संकल्प केलाय. योग क्रांतीनंतर आता पंच क्रांतीचा शंखनाद होणार असल्याचं योग गुरु रामदेव बाबा यांनी म्हटलंय. पुढील पाच वर्षांत 5 लाख शाळांना भारतीय शैक्षणिक बोर्डाशी जोडण्याचा संकल्प रामदेव बाबा यांनी केलाय. दरम्यान, यावेळी बोलताना रामदेव बाबा यांनी पतंजलीने गेल्या तीस वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडलाय.
हरिद्वार येथील योग भवन सभागृहात पतंजलीचा 30 चा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. पतंजली योगपीठाचे अध्यक्ष स्वामी रामदेव बाबा आणि महासचिव आचार्य बाळकृष्ण यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात देशभरातील पतंजली योगपीठ संस्थेच्या 6000 हून अधिक प्रभारींच्या उपस्थितीत रामदेव बाबा यांनी गेल्या 30 वर्षातील सेवा आणि संघर्षाचा काळ सांगितला. यावेळी त्यांनी पतंजलीच्या भविष्यातील योजनांबाबत भाष्य केलं. शिक्षण, आरोग्य, आर्थिक, वैचारिक-सांस्कृतिक आणि रोग-दु:ख-अपराध-निराशा यापासून मुक्ती देण्याचे मोठे कार्य पतंजलीपासून सुरू करावे लागेल, असंही यावेळी रामदेव बाबा म्हणाले.
रामदेव बाबा म्हणाले, मुलांना केवळ शब्दांची समज देऊन चालणार नाही, तर त्यांना विषयाचे आकलन, आत्मभान, भारताची आणि त्यांच्या अभिमानाची जाणीवही करुन दिली पाहिजे.आत्तापर्यंत पतंजलीने 1 लाख कोटींहून अधिक रक्कम समाज कार्यासाठी दान केली आहे. जगातील 500 कोटींहून अधिक लोकांची सनातन धर्मावर श्रद्धा आहे.
पहली क्रांती : शिक्षणाचे स्वातंत्र्य
आज काही ठिकाणी 99 टक्के सुशिक्षित बेरोजगार मुलं अंमली पदार्थांचे सेवन करत आहेत. चारित्रहीन वागत आहेत. काहींचे बालपण धोक्यात आहे. आम्ही ठरवले आहे की, भारतासह जगात नव्या शिक्षण पद्धती राबवायला हवी. पतंजली गुरुकुलम, आचार्यकुलम, पतंजली विद्यापीठ आणि भारतीय शिक्षण मंडळ आता शिक्षणासाठी नवीन प्रतिमान तयार करतील. आमचा संकल्प आहे की आम्ही येत्या पाच वर्षांत 5 लाख शाळा भारतीय शैक्षणिक बोर्डाशी जोडायचे. ही शिक्षणातील अभिनव क्रांती ठरेल.मुलांना केवळ शब्दांची समज देऊन चालणार नाही, तर त्यांना विषयाचे आकलन, आत्मभान, भारताची आणि त्यांच्या अभिमानाची जाणीवही करुन दिली पाहिजे. ही मॅकॉलेची शिक्षणपद्धती नसेल. 5 लाख शाळा भारतीय शिक्षण मंडळाशी संलग्न होतील, तेव्हा भारतातील लहान मुलं आणि तरुणपण सुरक्षित राहील, हा शिक्षण स्वातंत्र्याचा संकल्प आहे. भारतीय शिक्षण मंडळाच्या माध्यमातून आम्ही परकीय आक्रमक, अकबर, औरंगजेब किंवा इंग्रजांचे खोटे मोठेपण शिकवणार नाही तर छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि क्रांतिकारकांचा खरा इतिहास शिकवणार आहोत.
दुसरी क्रांती: आरोग्य क्षेत्रात आत्मनिर्भरता
आज जगभरातील सिंथेटिक औषधे, विविध प्रकारची स्टिरॉइड्स, पेन किलर इत्यादींच्या सेवनाने लोकांचे शरीर खराब होत आहे. वैद्यकीय स्वातंत्र्यासाठी आम्ही पतंजली वेलनेस, योगग्राम, निरामयम, रुग्णालये आणि आरोग्य केंद्रे आणि आधुनिक संशोधनाच्या माध्यमातून ऋषीमुनी आणि विज्ञानाचा वारसा घेऊन पुढे जात आहोत. जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये 5000 हून अधिक संशोधने आणि 500 हून अधिक शोधनिबंध प्रकाशित करून असाध्य रोगांपासून मुक्तीचा मार्ग जगासमोर मांडला आहे. आम्ही लोकांना आजारी पडण्यापासून वाचवू आणि रोग झाल्यावर त्यांना त्या आजारांपासून योग-आयुर्वेदाच्या माध्यमातून मुक्त करू, असा आपला संकल्प आहे.
तिसरी क्रांती: आर्थिक स्वातंत्र्य : आज जगभरातील मूठभर लोकांनी अर्थसत्ता आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केलाय. अर्थव्यवस्था अडकली आहे. सेवेसाठी समृद्धी आणि परोपकारासाठी संपत्ती हे आमचे ध्येय आहे. आत्तापर्यंत पतंजलीने शिक्षण, आरोग्य, संशोधन, चारित्र्य निर्माण, राष्ट्र उभारणी इत्यादी क्षेत्रात 1 लाख कोटी रुपयांचा खर्च करत समाज सेवा करण्याचा प्रयत्न केलाय. कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या नि:स्वार्थ सेवेतून राष्ट्र उभारणीसाठी सेवा होत आहे. स्वदेशी चळवळ एवढी मोठी व्हावी की, आर्थिक लूट, गुलामगिरी आणि दारिद्र्य यातून मुक्त झाला तरच भारत वैभवशाली होईल, हा आमचा संकल्प आहे.
चौथी क्रांती: वैचारिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य
भारत वैचारिक आणि सांस्कृतिक गुलामगिरीतून जात असेल तर ते योग्य नाही. भारत आज प्रत्येक गोष्टीसाठी जगातील त्या गरीब देशांवर अवलंबून आहे, ज्यांच्याकडे काही डॉलर्स किंवा पौंड आहेत. खरी संपत्ती ही केवळ पैसा नसून उत्तम आरोग्य, सुखी कुटुंब आणि चारित्र्य हीच खरी संपत्ती आहे. भारताला वैचारिक आणि सांस्कृतिक गुलामगिरीतून मुक्त करायचे आहे. त्यामुळेच आपण या सनातन धर्माचा, वेद धर्माचा, ऋषीधर्माचा, योगधर्माचा युगधर्म म्हणून प्रचार केला पाहिजे.
पाचवी क्रांती: व्यसन आणि व्यसनांधतेपासून मुक्तता
भारतात अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे आजार, नशा, अश्लीलता यामुळे लोकांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. रोग, व्यसनाधीनता आणि अश्लीलता यापासून मुक्त होण्याचा आपला संकल्प आहे. पतंजलीला 30वर्षे पूर्ण झाल्यामुळे आपण संपूर्ण जगाला योगमय बनवू, लोकांचे चारित्र्य विकसित करू आणि आदर्श जागतिक नागरिक घडवू असा आमचा संकल्प आहे.