(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pateti 2022 : आज साजरा केला जातोय पारशी समुदायाचा पतेती हा सण; जाणून घ्या या दिनाचं महत्त्व
Pateti 2022 : पतेती हा पारशी लोकांचा सण असून पारशी समाजाच्या पारंपरिक झोरोस्टर कॅलेंडरनुसार (Zoroastrian Calendar) वर्षाचा शेवटचा दिवस हा ‘पतेती’ म्हणून ओळखला जातो.
Pateti 2022 : पतेती (Pateti 2022) हा पारशी लोकांचा सण असून पारशी समाजाच्या पारंपरिक झोरोस्टर कॅलेंडरनुसार (Zoroastrian Calendar) वर्षाचा शेवटचा दिवस हा ‘पतेती’ म्हणून ओळखला जातो. या दिवशी पारशी बांधव अहुरा माजदाचे प्रतीक म्हणून अग्नीची पूजा करतात. या उत्सवात पारशी समाजातील लोक चांगले विचार करण्याचा, चांगले शब्द बोलण्याचा आणि चांगली कामे करण्याचा प्रयत्न करतात. भारतामध्ये 15 ऑगस्ट रोजी ‘पतेती’ सण आहे. तर 16 ऑगस्ट दिवशी पारशी समाज नववर्ष साजरं केलं जाणार आहे. पारशी नववर्षाचा पहिला दिवस हा नवरोझ (Nowruz) म्हणून देखील ओळखला जातो.
पतेती उत्सवाची सुरुवात कशी झाली?
झोरोस्टेरियन समुदायाच्या श्रद्धेनुसार 3000 वर्षांपूर्वी या दिवशी साह जमशेद इराणच्या सिंहासनावर बसला होता. पारसी समाजातील लोकांनी त्याचा जलाभिषेक करुन त्याला सिंहासनावर बसवले होते. जमशेद यांनीच सर्वप्रथम पारसी लोकांना वार्षिक कॅलेंडरची ओळख करून दिली होती. तेव्हापासून पारसी समाजातील लोकांनी पतेती दिवस साजरा करण्यास सुरूवात केली. पारशी समाजातील लोक दरवर्षी पतेती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. नवरोझच्या आधीचा दिवस हा पतेती असतो. या दिवशी वर्षभरात झालेल्या चूकांची, गुन्ह्यांची कबुली देऊन हा दिवस पश्चाताप करण्याचा असतो.
कसा साजरा केला जातो पतेती उत्सव?
पतेतीच्या दिवशी पारशी बंधु भगिनी सकाळी लवकर उठतात. या दिवशी सणानिमित्त विशेष स्नान केले जाते त्याला "नहान" असे म्हणतात. त्यानंतर नवीन कपडे परिधान करून सर्वजण अग्यारीत प्रार्थनेला जातात.अग्यारी हे पारशी समाजाचे धर्मस्थळ आहे.अग्नी ही त्यांना पूजनीय देवता असून अग्यारीमधे सतत अग्नी प्रज्वलित ठेवलेला असतो. पतेतीच्या दिवशी धर्मोपदेशक विशेष प्रार्थना करून आशीर्वाद देतात.नंतर सर्वजण परस्परांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतात.[२] पतेतीच्या दिवशी गरिबांना दान करण्याचे महत्त्व विशेष आहे.ज्याप्रमाणे परस्परांना भेटवस्तू आणि मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या जातात त्याप्रमाणे गरजूंना अन्नदान केले जाते. या दिवशीचे खास भोजन म्हणून सालीबोटी,मावा निबोई,पत्र निमाच्ची आणि रवा फालुदा हे पदार्थ केले जातात.
अशा देतात शुभेच्छा
भारतात जवळपास 60 हजार पारशी लोकं राहतात. पारशी लोकांचा धर्म झोरास्ट्रियन आहे, तर ‘अवेस्ता’ पारशी धर्मग्रंथ हा आहे. तुम्ही देखील तुमच्या पारशी मित्रमैत्रिणींना पारसी नववर्षाच्या शुभेच्छा देत असाल तर ‘पारशी नूतनवर्षाभिनंदन’ किंवा ‘हॅप्पी नवरोझ’ असं म्हणून त्यांचा आनंद द्विगुणित करू शकता.
महत्वाच्या बातम्या :