(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pakistani Drone: जम्मू-काश्मीरमध्ये दिसला पाकिस्तानी ड्रोन , शोध मोहीम सुरू
Pakistani Drone: रविवारी जम्मू-काश्मीरमधील सांबा येथील जाखच्या सीमा भागात पाकिस्तानी ड्रोन दिसल्याची माहिती समोर आली आहे.
Pakistani Drone: रविवारी जम्मू-काश्मीरमधील सांबा येथील जाखच्या सीमा भागात पाकिस्तानी (Pakistan) ड्रोन (Drone) दिसल्याची माहिती समोर आली आहे. येथील गावकऱ्यांनी संशयास्पद ड्रोन दिसल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्यानंतर विशेष ऑपरेशन ग्रुपने (SOG) शोध मोहीम सुरु केली आहे. याबाबत माहिती देताना पोलिस उपअधीक्षकांनी सांगितले की, गावकऱ्यांनी त्यांना येथे एका संशयास्पद ड्रोनबद्दल माहिती दिल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. एसओजीचे डीएसपी घारू राम यांनी सांगितले की, पाकिस्तानने सांबामध्ये पुन्हा एकदा ड्रोन पाठवले आहेत.
ते म्हणाले की, "संरक्षण सूत्रांनुसार, शनिवारी संध्याकाळी पाकिस्तानकडून एक ड्रोन भारतीय हद्दीत घुसले. त्यानंतर स्थानिक लोकांमध्ये खळबळ उडाली." ते पुढे म्हणाले की, सांबा सेक्टरमधील सारथी कलान या सीमावर्ती गावात ड्रोन दिसला. त्यानंतर ड्रोन डेरा आणि मदून गावातून रीगल आणि चक दुल्मा येथून परत पाकिस्तानमधील हैदर पोस्टपर्यंत गेले. हे ड्रोन जमिनीपासून किमान 1 किलोमीटर उंचीवर उडत होते.
शोध मोहीम सुरू
सुरक्षा दलांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि सकाळी सर्व भागात शोध मोहीम सुरू केली. डीएसपी घारू राम यांनी सांगितले की, पाकिस्तानने यापूर्वी अनेकदा असे प्रयत्न केले आहेत. ज्यामध्ये ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा भारतीय हद्दीत पाठवला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांचे एसओजी बांद्राली, जाख आणि सांबाच्या इतर लगतच्या भागातही मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवत आहे. बीएसएफच्या म्हणण्यानुसार, या वर्षी जुलैपर्यंत सीमेपलीकडे उड्डाण करणारे एकूण 107 ड्रोन भारतीय हद्दीत दिसले होते. जे गेल्या वर्षी 97 होते. गेल्या वर्षी सीमेपलीकडून येणाऱ्या 97 ड्रोनपैकी 64 पंजाबमध्ये, 31 जम्मूमध्ये आणि दोन जम्मूमध्ये नियंत्रण रेषेवरून (एलओसी) दिसले होते. जुलै 2022 पर्यंत आंतरराष्ट्रीय सीमेजवळ 107 ड्रोन दिसले. त्यात जम्मूमधील 14 आणि पंजाब सेक्टरमध्ये 93 ड्रोन आहेत. बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, यापैकी बहुतांश ड्रोन पाकिस्तानातून आले आहेत आणि त्यांचा वापर अंमली पदार्थ, शस्त्रे, स्फोटके आणि दारूगोळा पोहोचवण्यासाठी केला जातो.
महत्त्वाच्या बातम्या: