भारताच्या दबावानंतर पाकिस्तानची तंतरली, मसूद अजहरचं कार्यालय ताब्यात
बहावलपूरमधील मदरसातूल साबिर आणि जामा ए मशिद सुभानल्लामधील एक परिसर पंजाब सरकारने आपल्या ताब्यात घेतला आहे. दहशतवादी मसूद अजहर जैश ए मोहम्मदचा प्रमुख आहे आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदने घेतली होती.
नवी दिल्ली : भारताच्या दबावानंतर पाकिस्तानची तंतरली आहे. जैश ए मोहम्मदचा दहशतवादी मसूद अजहरच्या मुसक्या आवळण्यास पाकिस्तान सरकारनं सुरुवात केली आहे. पाकिस्तान सरकारने मसूज अजहरचं कार्यालय ताब्यात घेतलं आहे. पाकिस्तानच्या बहावलपूर येथे हे कार्यालय आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या पंजाब सरकारने जैश ए मोहम्मदच्या कार्यालयावर ही कारवाई केली आहे. बहावलपूरमधील मदरसातूल साबिर आणि जामा ए मशिद सुभानल्लामधील मसूदच्या जैश ए मोहम्मदचं मुख्यालय पंजाब सरकारने आपल्या ताब्यात घेतलं आहे.
दहशतवादी मसूद अजहर जैश ए मोहम्मदचा प्रमुख आहे आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदने घेतली होती.
पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद
पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
कोण आहे मसूद अजहर?
मसूद अजहरचा जन्म पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये झाला आहे. त्याचं शिक्षण जामिया उलूम उल इस्लामियात झालं आहे. त्यानंतर हरकत उल अंसारशी जोडल्यानंतर त्याने दहशतवादी कारवायांना सुरुवात केली.
मसूद 1994 मध्ये श्रीनगरमध्ये आला होता, त्यावेळी भारत सरकारने त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. मात्र त्यानंतर दहशतवाद्यांनी त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले. दहशतवाद्यांनी 1995 मध्ये काश्मीरमधून काही परदेशी पर्यटकांचं अपहरण केलं आणि मसूद अजहरच्या सुटकेची मागणी सुरु केली. त्यातील एक पर्यटक पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र त्यानंतर दहशतवाद्यांनी सर्व पर्यटकांची हत्या केली.
त्यानंतर डिसेंबर, 1999 मध्ये दहशतवाद्यांनी काठमांडू एअरपोर्टवरुन इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली येथे जाणाऱ्या IC814 विमानाचं अपहरण केलं आणि विमान अफगाणिस्तानच्या कंधार येथे घेऊन गेले. विमान अपहरण करून प्रवाशांना वेठीस धरलं आणि मसूद अजहरच्या सुटकेची मागणी सुरु केली. त्यानंतर प्रवाशांच्या जीवाच्या बदल्यात दहशतवाद्यांनी मसूद अजहरला भारताच्या तावडीतून सोडवून घेतलं.
व्हिडीओ- भारताविरुद्ध पाकिस्तानचे धादांत खोटे दावे सुरुच