Cheetah Dies Kuno National Park: आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू; बेशुद्ध झाल्यानंतर तेजसने घेतला अखेरचा श्वास
Kuno National Park: दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या ‘तेजस’ या नर चित्त्याचा मृत्यू झाला आहे. तेजस हा जखमी अवस्थेत आढळून आला होता.
Cheetah Dies Kuno National Park: मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून मंगळवारी पुन्हा एकदा वाईट बातमी आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या ‘तेजस’ या नर चित्त्याचा मृत्यू झाला आहे. कुनो पार्क व्यवस्थापनाच्या निरीक्षणादरम्यान हा चित्ता(Cheetah) जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्या मानेच्या वरच्या भागात जखमा दिसून आल्या होत्या. कुनो नॅशनल पार्कमध्ये आतापर्यंत 4 चित्ता आणि 3 शावकांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास देखरेख पथकाला 'तेजस' या नर चित्ताच्या मानेच्या वरच्या भागावर जखमेच्या खुणा दिसल्या. मॉनिटरिंग टीमने पालपूर मुख्यालयात उपस्थित असलेल्या प्राण्यांच्या डॉक्टरांना ही माहिती दिली. प्राण्यांच्या डॉक्टरांनी घटनास्थळी जाऊन तेजस चित्ताची तपासणी केली असता जखम गंभीर असल्याचे दिसून आले. यानंतर तेजसला बेशुद्ध करून उपचारासाठी पाठवण्यात आले.
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मृत
घटनास्थळी पोहोचलेल्या डॉक्टरांना दुपारी दोनच्या सुमारास 'तेजस' मृतावस्थेत आढळून आला. सध्या तेजसला झालेल्या दुखापतींबाबत तपास सुरू आहे. त्याशिवाय, त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
तिघांचा आधीच मृत्यू
कुनो नॅशनल पार्कमधून गेल्या दोन महिन्यांत 3 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. सिया (ज्वाला) चित्ताने 24 मार्च रोजी 4 शावकांना जन्म दिला होता, मात्र आतापर्यंत यातील तीन शावकांचा मृत्यू झाला आहे. आता कुनो पार्कमध्ये 16 प्रौढ चित्ता आणि 1 शावक आहे. वन्यजीव तज्ज्ञांनीही वारंवार होणाऱ्या मृत्यूंबाबत चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, नामिबियातून भारतात आलेल्या चित्त्यांपैकी एक असलेल्या साशाचा 27 मार्च रोजी मूत्रपिंडाशी संबंधित आजारामुळे मृत्यू झाला. नामिबियामध्ये असताना साशाला हा आजार झाला होता आणि कुनो येथे आल्यापासून ती आजारी होती असे मानले जाते. दक्षिण आफ्रिकेच्या चित्ता उदयचे 13 एप्रिल रोजी निधन झाले. उदयचा मृत्यू हा कार्डिओपल्मोनरी फेल्युअरने झाल्याचे मानले जात होते. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या मादी चित्ता दक्षा ही जखमी झाल्यामुळे मृत्यूमुखी पडली. तिचा 9 मे रोजी मृत्यू झाला होता. 'दक्षा'ला दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणण्यात आले होते. मृत्यू झाला तेव्हा तिचे वय सहा वर्षे इतके होते.
1952 मध्ये भारतातून चित्ता नामशेष
भारतातून 1952 मध्ये चित्ता नामशेष झाला. छत्तीसगढमध्ये शेवटच्या चित्याची शिकार झाली होती. त्यानंतर आशियात इराणमध्येच चित्त्याचं वास्तव्य होतं. 1970 मध्ये इंदिरा गांधींनी इराणहून भारतात चित्ते आणण्याची तयारी सुरु केली होती. आमचे काही वाघ तुम्हाला घ्या, त्या बदल्यात चित्ते आम्हाला द्या अशी ती ऑफर होती. इराणच्या शाहांशी इंदिरा गांधी यांनी करारावर सह्याही केल्या होत्या. पण इराणमध्ये वादळी सत्ताबदल झाला, शाहांची राजवट गेली नंतर हा प्रोजेक्ट बारगळला.
आफ्रिकेतून चित्ते आणण्याची परवानगी
त्यानंतर भारतात पुन्हा चित्ते आणण्यासाठीची हालचाल 2009 मध्ये सुरु झाली. यूपीए सरकारच्या काळात अनेक प्राणीमित्र, आंतरराष्ट्रीय संघटनांनी आफ्रिकेतून चित्ते आणता येतील का याबाबत हालचाली सुरु केल्या. मध्य प्रदेशचं कुनो नॅशनल पार्क, जैसलमेरचं शाहगड अशी काही ठिकाणंही निश्चित झाली. पण 2012 मध्ये सुप्रीम कोर्टानं अशा पद्धतीनं चित्ते भारतात आणायला मनाई केली. भारतातल्या वाघांच्या पुनर्वसनाचं काम सुरु असतानाच तिथे चित्ते येणार, आफ्रिकन चित्त्यांना हे हवामान मानवेल का अशी चिंता सुप्रीम कोर्टाला वाटली. पण सात वर्षानंतर 2020 मध्ये सुप्रीम कोर्टानं ही बंदी उठवली. त्यानंतर प्रायोगिक तत्वावर आफ्रिकेतून चित्ते आणण्याची परवानगी भारताला मिळाली.