Cheetah death: दक्षिण आफ्रिकेतून आणलेला आणखी एक चित्ता मृत्यूमुखी, गेल्या 40 दिवसांमध्ये तिसऱ्या चित्त्याचा मृत्यू
Cheetah death: मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आलेल्या 20 चित्त्यांपैकी आणखी एका चित्त्याचा (मादी) मृत्यू झाला आहे. तर गेल्या चाळीस दिवसांमध्ये तीन चित्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
Cheetah death: आफ्रिकेतून भारतात आणण्यात आलेल्या आणखी एका चित्त्याचा आज मृत्यू झाला आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानातील दक्षा या मादी चित्याचा आज मृत्यू झाला. या आधी दोन चित्त्यांचा मृत्यू झाला होता. दक्षिण आफ्रिकेतून (South Afrcia) भारतात चित्ते (Cheetah) आणण्यात आले होते. या 20 पैकी तीन चित्त्यांचा गेल्या 40 दिवसांत मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
नेमकं काय घडलं?
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दक्षा' आज सकाळी जखमी अवस्थेमध्ये आढळून आली. त्यानंतर तिला लगेचच आवश्यक ते उपचार देण्यात आले. परंतु दुपारी 12 वाजता तिचा मृत्यू झाला.
'दक्षा'ला दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणण्यात आले होते. मृत्यू झाला तेव्हा तिचे वय सहा वर्षे इतके होते. सप्टेंबर आणि फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात नष्ट झालेल्या प्रजातींना आणण्यात आले. परंतु यातील तीन चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. याआधी 23 आणि 27 एप्रिल रोजी दोन चित्त्याच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
चित्त्यांच्या या मृत्यूंच्या वाढत्या संख्येमुळे केंद्र सरकारच्या उद्देशावर आता प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे की, “इतर चित्त्यांचे बारकाईने निरीक्षण केले गेले असून ते सर्व पूर्णपणे निरोगी दिसत आहेत. तसेच ते स्वतःसाठी शिकार देखील करतात”
Female cheetah 'Daksha' dies in MP's Kuno National Park: Forest official; 3rd fatality in around 40 days
— Press Trust of India (@PTI_News) May 9, 2023
1952 मध्ये भारतातून चित्ता नामशेष
भारतातून 1952 मध्ये चित्ता नामशेष झाला. छत्तीसगढमध्ये शेवटच्या चित्याची शिकार झाली होती. त्यानंतर आशियात इराणमध्येच चित्त्याचं वास्तव्य होतं. 1970 मध्ये इंदिरा गांधींनी इराणहून भारतात चित्ते आणण्याची तयारी सुरु केली होती. आमचे काही वाघ तुम्हाला घ्या, त्या बदल्यात चित्ते आम्हाला द्या अशी ती ऑफर होती. इराणच्या शाहांशी इंदिरा गांधी यांनी करारावर सह्याही केल्या होत्या. पण इराणमध्ये वादळी सत्ताबदल झाला, शाहांची राजवट गेली नंतर हा प्रोजेक्ट बारगळला.
आफ्रिकेतून चित्ते आणण्याची परवानगी
त्यानंतर भारतात पुन्हा चित्ते आणण्यासाठीची हालचाल 2009 मध्ये सुरु झाली. यूपीए सरकारच्या काळात अनेक प्राणीमित्र, आंतरराष्ट्रीय संघटनांनी आफ्रिकेतून चित्ते आणता येतील का याबाबत हालचाली सुरु केल्या. मध्य प्रदेशचं कुनो नॅशनल पार्क, जैसलमेरचं शाहगड अशी काही ठिकाणंही निश्चित झाली. पण 2012 मध्ये सुप्रीम कोर्टानं अशा पद्धतीनं चित्ते भारतात आणायला मनाई केली. भारतातल्या वाघांच्या पुनर्वसनाचं काम सुरु असतानाच तिथे चित्ते येणार, आफ्रिकन चित्त्यांना हे हवामान मानवेल का अशी चिंता सुप्रीम कोर्टाला वाटली. पण सात वर्षानंतर 2020 मध्ये सुप्रीम कोर्टानं ही बंदी उठवली. त्यानंतर प्रायोगिक तत्वावर आफ्रिकेतून चित्ते आणण्याची परवानगी भारताला मिळाली.