(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Omicron Corona Variant : 5 राज्य, 21 रुग्ण; लसवंतांनाही संसर्ग, देशात वाढतोय ओमायक्रॉन, काळजी घ्या
Omicron Variant in India : ओमायक्रॉननं वाढवली धाकधुक. 5 राज्यांत 21 रुग्ण, मात्र लक्षणं सौम्य, भारतात वेगानं फोफावतोय ओमायक्रॉन.
Omicron Variant in India : जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं धाकधुक वाढवली आहे. अशातच आता या व्हेरियंटनं भारतातही प्रवेश केला आहे. जगभरातील एकूण 38 देशांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाल्याची माहिती मिळत आहे. भारतातही आता ओमायक्रॉन आपले हातपाय पसरताना दिसत आहे. केवळ चारच दिवसात भारतात ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 21 वर पोहोचली आहे. 2 डिसेंबर रोजी देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तर 6 डिसेंबरपर्यंत या व्हेरियंटची संख्या 21 वर पोहोचली आहे.
रविवारी एका दिवसात ओमायक्रॉनचे नवे 17 रुग्ण देशात आढळून आले. राजस्थानच्या जयपूरमध्ये 9, महाराष्ट्रात 7 आणि राजधानी दिल्लीमध्ये 1 या रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरियंट राजधानी दिल्लीसह 5 राज्यात फैलावला आहे. अशातच देशातील एकूण ओमायक्रॉनची संख्या 21 वर पोहोचली आहे. सर्वाधिक 9 रुग्ण राजस्थानमध्ये आहे, तर 8 रुग्ण महाराष्ट्रात, 2 रुग्ण कर्नाटकात, तर दिल्ली आणि गुजरातमध्ये प्रत्येकी 1-1 रुग्ण आहे.
जयपूरमधील एकाच कुटुंबातील 9 जणांना ओमायक्रॉनची लागण
दक्षिण अफ्रीकामधून राज्यस्थानमध्ये आलेल्या कुटुंबाच्या जनुकीय अनुक्रम (जीनोम सिक्वेन्सिंग) तपासात नऊ जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचं समोर आलं. आरोग्य सचिव वैभव गालरिया म्हणाले की, दक्षिण आफ्रिकातून आलेल्या कुटुंबाला आणि त्यांच्या संपर्कातील ओमायक्रॉन रुग्णांना उपचारासाठी आरयूएचएसमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णांमध्ये सध्या सौम्य लक्षणं जाणवत आहेत.
पाहा व्हिडीओ : महाराष्ट्रातल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 8 वर
महाराष्ट्रात ओमायक्रॉन रुग्णाची संख्या 8 वर
शनिवारी डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा एक रुग्ण आढळला होता. यामध्ये आता पुण्यातील 7 रुग्णांची भर पडली आहे. रविवारी पिंपरी चिंचवडमधील 6 तर पुण्यात एका रुग्णाची भर पडली आहे. पिंपरी चिंचवडमधील एकाच कुटुंबातील सहा जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. नायजेरियातून भावाला भेटण्यासाठी आलेल्या 44 वर्षीय महिलेला, तिच्यासोबत आलेल्य दोन मुलींना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्याशिवाय त्या महिलेचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुलींनाही ओमायक्रॉनची लागण झाली आहे. सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून पिंपरी-चिंचवडमधील जिजामाता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या सहा रुग्णापैकी तीन जण 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.
ओमायक्रॉन इतर व्हेरियंटपेक्षा धोकादायक नाही, सिंगापूर आरोग्य मंत्रालयाची माहिती
जगभरात ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंटव्हेरियंटव्हेरियंट चिंतेचा विषय बनला असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट कोरोनाच्या (Corona) इतर व्हेरियंटपेक्षा धोकादायक असल्याचा अद्याप कोणताही पुरावा नसल्याची माहिती सिंगापूर आरोग्य मंत्रालयानं (Singapore Health Ministry) दिली आहे. याबाबत अधिक निष्कर्षासाठी आणि व्हेरियंटची संरचना जाणून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल असंही त्यांनी पुढे सांगितलं आहे. ओमायक्रॉन इतर व्हेरियंटपेक्षा धोकादायक असण्याचे किंवा या व्हेरियंटवर सध्याची कोविड लस प्रभावी नसल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, अशी माहिती सिंगापूर आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. 'चॅनल न्यूज एशिया' वृत्तपत्राच्या माहितीनुसार, मंत्रालयानं सांगितलं की, ओमायक्रॉनबद्दल अधिक माहिती आणि अभ्यास आवश्यक आहे. येत्या आठवड्यात जागतिक स्तरावर आणखी माहिती समोर येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- नायजेरियामधून डोंबिवलीत आलेल्या 4 कोरोनाबाधिताच्या संपर्कातील आणखी दोघांना लागण
- Omicron Variant : दिलासादायक! ओमायक्रॉन इतर व्हेरियंटपेक्षा धोकादायक नाही... 'या' देशाची माहिती
- Hybrid Immunity : ओमायक्रॉनवर भारतीयांची हायब्रिड इम्युनिटी प्रभावी ठरेल का?
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या लाईव्हमध्ये, पाहण्यासाठी क्लिक करा