Teesta Setalvad Case: तिस्ता सेटलवाड यांना दिलासा, तात्काळ समर्पणाच्या गुजरात न्यायालाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
Teesta Setalvad Case: सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना उच्च न्यायालयाने जामीन नाकारून आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. तर हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहचले आहे.
Teesta Setalvad Case: तिस्ता सेटलवाड यांनी तात्काळ आत्मसमर्पन करावं या गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने एक आठवड्यासाठी स्थगिती दिली आहे. गुजरात दंगलीनंतर राज्य सरकार विरोधात कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्या प्रकरणी गुजरात न्यायालयाने त्यांना तात्काळ समर्पण करण्याचा आदेश दिला होता.
गुजरात (Gujarat) उच्च न्यायालयाने समाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड ( Teesta Setalvad) यांना तात्काळ आत्मसमर्पण करण्यास सांगितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यावर विशेष टिप्पणी केली आहे. तिस्ता सेटलवाड यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतरिम जामीनासाठी अर्ज करणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. तिस्ता सेटलवाड यांना अंतरिम दिलासा देण्यासाठी दोन न्यायमूर्तींनी वेगवेगळे निष्कर्ष नोंदवले आहेत. न्यायमूर्ती ओका यांनी सेटलवाड यांना दिलासा देण्याची सहमती दर्शवली तर न्यायमूर्ती मिश्रा यांनी त्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. आता तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
अंतरिम जामिनाच्या अटीचे उल्लंघन का झाले? असा सवाल सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी यावेळी उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने तिस्ता यांचा जामीन मंजूर केला होता. परंतु आता गुजरात उच्च न्यायालयाने त्यांचा नियमित जामीन नाकारला असून शनिवारी त्यांना आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, यावर सोमवारी सुनावणी करण्यात येईल तोपर्यंत तिस्ता यांच्यावर कोणतीही कारवाई करु नये.
गुजरात सरकारकडून सॉलिसिटर जनरल या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये हजर झाले होते. यावेळी ते म्हणाले की, 'तिस्ता यांचा जामीन नाकरण्यासाठी उच्च न्यायालयाने 127 पानी आदेशात पुरेशी कारणे दिली आहेत.' यावर सेटलवाड या नऊ महिन्यांपासून जामिनावर आहेत, तर मंगळवारपर्यंत काय बिघडणार आहे असा सवाल न्यायाधीशांनी उपस्थित केला आहे.
तिस्ता सेटलवाड यांच्यावर कोणते आरोप
गुजरातमध्ये झालेल्या दंगलीनंतर तिस्ता सेटलवाड यांनी भाजप सरकारविरोधात कट आखला असल्याचा आरोप गुजरात सरकारच्या विशेष चौकशी पथकाने त्यांच्या अहवालामध्ये केला आहे. तिस्ता यांना सक्रिय राजकारणात उतरण्याची इच्छा होती, त्यासाठी हा कट आखला असल्याचे गुजरात सरकारच्या SIT ने म्हटले आहे.
गुजरात सरकारच्या एसआयटीने आरोप केला आहे की, केंद्र सरकारने 2007 मध्ये तिस्ता सेटलवाड यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. तिस्ता यांची राजकीय महत्त्वाकांक्षा मोठी होती. ही महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी तिस्ता यांनी प्रयत्न केले असल्याचे एसआयटीने म्हटले होते. एसआयटीने एका साक्षीदाराच्या हवाल्याने सांगितले की, एका राजकीय नेत्याला तिस्ता यांनी विचारले की, शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांना खासदार बनवण्यात आले. मात्र, मला संधी का दिली नाही?' तर तिस्ता सेटलवाड यांनी दंगल पीडितांसाठी जमवण्यात आलेल्या निधीचा दुरुपयोग केला असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. तिस्ता यांनी या निधीचा वापर खासगी वापरासाठी केला असल्याचे म्हटले.