गोव्यात नेतृत्व बदलाचा प्रश्नच नाही- भाजप प्रदेशाध्यक्ष
राज्यातील भाजपचे सरकार कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्रीपद मनोहर पर्रिकर यांच्याकडे कायम राहिल, असं गोव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी स्पष्ट केलं.
पणजी : राज्यातील भाजपचे सरकार कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्रीपद मनोहर पर्रिकर यांच्याकडे कायम राहिल, असं गोव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी स्पष्ट केलं. भाजपचे 3 निरीक्षक संघटनात्मक कामासाठी गोव्यात आले असून बैठकांचे सत्र सुरु झाले असल्याचे तेंडुलकर यांनी सांगितले. पर्रिकर थोड्या दिवसांसाठी उपलब्ध असणार नाहीत. उपचरानंतर पर्रिकर पुन्हा कामाला लागतील असंही तेंडुलकर म्हणाले.
मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या आजारामुळे राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्री बदलण्याची सध्या गरज नाही. मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही तेंडुलकर यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांना काल सकाळी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर गोव्यात नेतृत्वबदलासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. बदललेल्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय निरीक्षक आज सकाळपासून गोव्यात दाखल झाले आहेत. निरीक्षक बी. एल. संतोष सकाळी दाखल झाले तर विजय पुराणिक आणि रामलाल दुपारी पोहोचले. हे सर्व पणजीतील फिदाल्गो हॉटेलमध्ये थांबले आहेत.
त्याठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, खासदार नरेंद्र सावईकर, पक्षाचे सरचिटणीस सदानंद शेट तनावडे आणि इतर पदाधिकारी निरीक्षकांना भेटले. सरकारमधील प्रत्येक आमदाराचे मत जाणून घेण्यापूर्वी पक्षाच्या कोअर टीमकडे चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
निरीक्षकांना भेटून हॉटेलमधून बाहेर पडताना प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी नेतृत्व बदलाची गरज नसल्याचं सांगितलं. मुख्यमंत्री पर्रीकर यांची प्रकृती स्थिर झाली असून तेच सरकारचे नेतृत्व करतील. इतर काही बदल होणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र कोणते बदल होणार हे तेंडुलकर यांनी स्पष्ट केले नाही. मुख्यमंत्री पदाचा ताबा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर किंवा नगर नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे सोपविण्याच्या प्रस्तावाविषयी विचारले असताही त्यांनी सध्या तशी गरज नसल्याचे सांगितले.