घरी पोहोचण्यासाठी पायपीट करणाऱ्यांना टोलनाक्यावर अन्न-पाणी पुरवा : नितीन गडकरी
लॉकडाऊनमुळे खाण्यापिण्याचे हाल होत असल्याने अनेक मजूर तसंच नागरिक आपापल्या घरी पोहोचण्यासाठी शेकडो किलोमीटर पायपीट करत आहेत. त्यांना अन्न-पाणी देण्याची सूचना नितीन गडकरी यांनी केली आहे.
मुंबई : आपापल्या गावात जाण्यासाठी पायपीट करणाऱ्या मजूर तसंच नागरिकांना अन्नपाणी तसंच इतर मदत पुरवा, अशी सूचना केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसंच टोल ऑपरेटर आणि संबंधित यंत्रणांना केली आहे. नितीन गडकरी यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे.
लॉकडाऊनमुळे खाण्यापिण्याचे हाल होत असल्याने अनेक मजूर तसंच नागरिक आपापल्या घरी पोहोचण्यासाठी शेकडो किलोमीटर पायपीट करत आहेत. लेकराबाळांसह अख्ख कुटुंब उन्हातान्हात पायपीट करुन आपल्या गावाच्या दिशेने निघाले आहेत. मात्र त्यातही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागता आहे. लॉकडाऊनमुळे सगळंच बंद असल्याने खाण्यापिण्याचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळेच नितीन गडकरी यांनी या सगळ्यांना मदत करण्याची सूचना केली आहे.
नागरिकांचे स्थलांतर थांबवा, जिथं आहेत तिथं थांबवून त्यांची व्यवस्था करा, राज्यपालांचे निर्देश
नितीन गडकरी यांनी लिहिलं आहे की, "राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसंच टोल ऑपरेटर्सना सल्ला दिला आहे आहे की, घरी पोहोचण्यासाठी पायपीट करणाऱ्या स्थलांतरित मजूर तसंच नागरिकांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करा. सध्याच्या परिस्थितीत आपण या या बांधवांची मदत केली पाहिजे. मला खात्री आहे की, टोल ऑपरेटर्स या सूचनेला प्रतिसाद देतील."
At this time of crisis we have to be compassionate for our fellow citizens. I am sure Toll Operators shall respond to this call. #IndiaFightsCorona
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) March 28, 2020
नागरिकांचा जीवघेणा प्रवास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली. या घोषणेनंतर संपूर्ण देशातील प्रवासी साधनांची वाहतूकही बंद झाली. अशा परिस्थितीमध्ये मुंबई, पुण्यासारख्या शहरातून गावाकडं जाणासाठी लोकं जीवघेण्या मार्गांचा अवलंब करत आहेत. यात मजुरांचं प्रमाण जास्त आहे. आता रोजगार नाही आणि त्यातच कोरोनाची लागण होण्याच्या भीतीमुळे इतर राज्यातून मुंबईत काम करण्यास आलेल्या कामगारांनी विविध मार्गांनी शहरं सोडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. काही जण जीव धोक्यात घालून मिळेल त्या वाहनाने प्रवास करत असल्याचे व्हिडीओ समोर आले. काही जण ट्रकच्या मागे लटकून प्रवास करताना दिसले. तर काही जण एका ट्रकमध्ये अक्षरश: दाटीवाटीने, कोंबून प्रवास करत होते. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जिथे आहात, तिथेच राहणं गरजेचं आहे. कारण पुढील काही दिवस राज्यासाठी कसोटीचे असल्याचं त्यांनी सांगितलं. तरीही लोक असा जीवघेणा प्रवास करत आहेत.