PM Modi : ओमिक्रॉन व्हेरिएंटवर पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता, सतर्क राहण्याचा दिला आदेश
Omicron Variant : पंतप्रधानांनी नव्या विषाणूच्या उद्रेकाबद्दल चिंता व्यक्त केली आणि रुग्ण आढळलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले
Omicron Variant : आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जगभरात खळबळ उडाली आहे. जगातील अनेक देश सतर्क झाले असून कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा संसर्ग होऊ नये यासाठी पावले उचलली जात आहे. केंद्र सरकारनेही यावर सावध भूमिका घेत उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्थरीय बैठक घेत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवरील निर्बंध हटवण्याच्या निर्णयाबद्दल फेरविचाराचे निर्देशही हवाई वाहतूक मंत्रालयाला दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सकाळी कोविड-19 साठी सार्वजनिक आरोग्य सज्जता, नवीन व्हेरिएंट आणि लसीकरण संबंधित परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सुमारे दोन तास बैठक झाली. या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी नव्या विषाणूच्या उद्रेकाबद्दल चिंता व्यक्त केली आणि रुग्ण आढळलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले, असे पंतप्रधान कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या बैठकीला कॅबिनेट सचिव राजीव गौबा, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के.पॉल, आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव, भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. के. विजय राघवन आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना 'ओमिक्रॉन' हा विषाणूचा नवीन प्रकार आणि त्याची लक्षणे तसेच विविध देशांमध्ये दिसलेल्या त्याच्या प्रभावाविषयी माहिती दिली. विषाणूच्या या स्वरूपाचे भारतावर होऊ शकणााऱ्या परिणामांबाबतही चर्चा करण्यात आली. विषाणूच्या नवीन प्रकाराच्या पार्श्वभूमीवर सक्रिय पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या नवीन धोक्यामुळे नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आणि मास्क लावणे आणि सामाजिक अंतर यांसारखी योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे असे पंतप्रधान म्हणाले. 'धोका ' असल्याचे निश्चित करण्यात आलेल्या देशांवर विशिष्ट लक्ष केंद्रित करून सर्व भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांवर लक्ष ठेवण्याची, मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांची चाचणी करण्याची गरज पंतप्रधानांनी सांगितलं. विषाणूचा नवा प्रकार उद्भवल्याच्या पार्श्वभूमीवर,आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध कमी करण्याच्या नियोजनाचा आढावा घेण्याच्या सूचना पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
देशात विषाणूच्या जनुकीय अनुक्रम निर्धारित करण्यासाठी आणि देशात पसरणाऱ्या विषाणूचा रुपांसंदर्भात पंतप्रधानांना आढावा देण्यात आला. जनुकीय अनुक्रमाचे नमुने आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि समुदायाकडून नियमांनुसार संकलित केले जातील, या नमुन्यांची चाचणी आयएनएसएसीओजी (INSACOG) अंतर्गत पूर्वीच स्थापित केलेल्या प्रयोगशाळांच्या नेटवर्कद्वारे आणि कोविड-19 व्यवस्थापनासाठी निश्चित करण्यात आलेल्या पूर्व इशारा संकेताद्बारे केली जाईल, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले. विषाणूचे जनुकीय अनुक्रमाचे प्रयत्न वाढवण्याच्या आणि ते अधिक व्यापक करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली.