(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा
काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय पक्षाच्या नेतृत्वाने घेतला आहे. प्रसिद्धी पत्रकाद्वारे कॉंग्रेसने नवज्योतसिंग सिद्धू यांच्या निवडीची घोषणा केला आहे. सुनील जाखड यांच्या जागी नवज्योतसिंग सिद्धू यांची निवड झाली आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांच्या निवडीबरोबर चार कार्यकारी अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. संगत सिंह, कुलजीत नागरा, पवन गोयल आणि सुखविंदर डैनी यांटी कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीला आता एका वर्षापेक्षाही कमी कालावधी उरला असताना नवज्योतसिंग सिद्धू यांची निवड करण्यात आली आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांना येत्या काळात अनेक संकटाचा सामना करावा लागणार आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांचा यासाठी विरोध असल्याच्या चर्चा होता. पण शेवटी सिद्धू यांनी ही मॅच देखील जिंकली आहे.
नवज्योत सिद्धू हे 57 वर्षाचे...2017 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीआधीच नवज्योत सिद्धू हे भाजप सोडून काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसचं सरकारही आलं पण ज्यांच्या चेहऱ्यावर या निवडणुका लढल्या ते कॅप्टन अमरिंदरच मुख्यमंत्री झाले त्यांनी सिद्धू यांना कमी महत्वाची खाती देत साईडलाईन केलं. 2019 मध्येच सिद्धू मंत्रिमंडळातूनही बाहेर पडले आणि आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर आक्रमक झाले होते.
पुढच्या वर्षी मार्चच्या दरम्यान युपी, उत्तराखंड सह पंजाबच्या निवडणुका अपेक्षित आहेत. देशात राजस्थान, छत्तीसगढ, पंजाब या तीनच राज्यात काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी पंजाबमध्ये अनुकूल वातावरणही मानलं जातंय. पण सिद्धू यांच्या निवडीचा परिणाम पक्षाच्या कामगिरीवर कसा होतो हे पाहावं लागेल. साहजिकच विरोधकही या एपिसोडकडे डोळे लावून बसले आहे.