Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सीचा प्रकार म्हणजे चीट फंड सारखा, लवकरच फुगा फुटणार; रघुराम राजन यांचा इशारा
Cryptocurrency : येत्या काळात जगभरातल्या क्रिप्टोकरन्सी बंद पडणार असून त्यापैकी एक-दोनच अस्तित्वात राहतील असं मत आरबीआयचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे.
मुंबई : जगभरातील क्रिप्टोकरन्सीचे मार्केटमध्ये जरी तेजी असली तरी हा प्रकार चिट फंडसारखा आहे. येत्या काळात याचा फुगा फुटणार असून अनेक क्रिप्टोकरन्सी संपुष्टात येणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. जगभरात सध्या सहा हजाराहून जास्त क्रिप्टोकरन्सी बाजारात आहेत. पण यापैकी एक-दोन किंवा हाताच्या बोटावर मोजण्याइतपत क्रिप्टोकरन्सी उरतील असं भाकितही त्यांनी व्यक्त केलं आहे.
सीएनबीसी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रघुराम राजन म्हणाले की, "येत्या काही काळात या क्रिप्टोकरन्सीचा फुगा फुटणार आहे. या क्रिप्टोकरन्सींची अवस्था चीट फंडसारखी होणार आहे. चीट फंडमध्ये ज्या प्रकारे लोक मोठ्या परताव्याच्या उद्देशाने गुंतवणूक करतात आणि नंतर त्यांना पश्चाताप करावा लागतो, त्याच प्रमाणे क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची अवस्था होणार आहे. याच्या किंमतीत एकदम वाढ होते, त्यामुळे गुंतवणूकदार याकडे आकर्षित होतात आणि विचार न करता गुंतवणूक करतात."
बहुतांश क्रिप्टोकरन्सीचे स्थायी मूल्य नाही असं मत आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे. सध्या जगभरात सहा हजाराहून जास्त क्रिप्टोकरन्सी आहेत. त्यामध्ये बिटकॉईन, इथेरिअम, टेथर, डॉजेकॉईन या सारख्या क्रिप्टोकरन्सी जास्त लोकप्रिय आहेत.
भारतात क्रिप्टोकरन्सी विधेयक सादर होणार
संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या 29 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामध्ये एकूण 26 विधेयकं सादर करण्याची तयारी सरकारकडून करण्यात आली आहे. यामध्ये क्रिप्टोकरन्सीचे विधेयक सादर होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सीवर व्यापक चर्चा होणार आहे. अधिवेशनात क्रिप्टोकरन्सीचे नियमन करण्यासाठी आणि इतर 25 कायद्यांसह सर्व खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्यासाठी एक विधेयक आणलं जाणार आहे.
संबंधित बातम्या :
- Winter Session : मोजके अपवाद वगळून खाजगी क्रिप्टोकरन्सीवर भारतात बंदी? संसदेच्या आगामी अधिवेशनात 26 विधेयकं पटलावर
- Cryptocurrency : नव्या क्रिप्टो करन्सी विधेयकात खाजगी क्रिप्टो करन्सीवर बंदी! हिवाळी अधिवेशनात विधेयकावर चर्चा
- Cryptocurrency : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सी विधेयक सादर होणार