(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मान्सून कर्नाटकात दाखल! महाराष्ट्रात या दिवशी दाखल होणार, मुसळधार पावसामुळे बंगळुरूसह केरळमध्ये पूर परिस्थिती
Monsoon Tracker : मान्सून कर्नाटकात दाखल झाला आहे. यामुळे बंगळुरूमध्ये जोरदार पाऊस सुरु असून हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Monsoon Update : केरळमध्ये (Kerala) दाखल झालेला मान्सून (Monsoon) तामिळनाडूमधून (Tamil Nadu) पुढे सरकरला असून आता कर्नाटकात (Karnataka) धडकला आहे. नैऋत्य मान्सूनच्या हजेरीमुळे कर्नाटकची राजधानी बंगळुरूला आज जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, साधारणपणे ढगाळ आकाश, पाऊस आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवस या भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सून कर्नाटकच्या काही भागांमध्ये दाखल झाला आहे. मात्र, अद्याप मान्सूनने पूर्ण तामिळनाडू आणि कर्नाटक व्यापलेल नाही.
मान्सून कर्नाटकात दाखल!
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दक्षिण भारतात 5 जून ते 7 जून या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय काही भागात मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याचाही अंदाज आहे. तसेच, 2 आणि 3 जून रोजी कर्नाटकात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दुसरीकड मुंबईसह महाराष्ट्राच मान्सूनची प्रतिक्षा आहे. महाराष्ट्रात पुढील आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर, 3 आणि 4 जून रोजी मुंबई, ठाणे जिल्ह्यांसह महाराष्ट्रात इतर काही भागात मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
बंगळुरूसह केरळमध्ये पूर परिस्थिती
आयएमडीच्या अंदाजानुसार, 7 जूनपर्यंत दिल्लीमध्ये आकाश निरभ्र राहील आणि कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस आणि किमान 29 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. एकीकडे दक्षिणेकडे मान्सून पोहोचला असताना, आयएमडीने दिल्लीसह उत्तर भारतात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे. दिल्लीवासीयांना जून महिन्याच्या अखेरपर्यंत उन्हाळ्याच्या उष्णतेपासून कोणताही दिलासा मिळणार नाही, असं आयएमडीने सांगितलं आहे.
मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
भारतीय हवामान विभागने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, केरळ आणि तामिळनाडूमध्ये गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस तर काही भागात अतिवृष्टी झाली आहे. दिवसाच्या अखेरीस सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कमी झाला होता, मात्र मध्यरात्री पुन्हा पावसाने जोर धरला. केरळमध्ये 30 मे रोजी मान्सून दाखल झाला असून आत्तापर्यंत पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जोरदार पूर आला असून अनेक भागातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
महाराष्ट्रात या दिवशी दाखल होणार
मान्सूनच्या उत्तरार्धात ला नीना परिस्थितीमुळे देशात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. केरळमध्ये यंदा मान्सून दोन दिवस आधीच दाखल झाला आहे. मान्सून आता केरळमध्ये दाखल झाला असून महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात 10 किंवा 11 जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता याआधीच भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :