(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Monsoon Update In India: या आठ राज्यांना पावसाने झोडपून काढलं, महापुराच्या महासंकटाचं देशात थैमान
Monsoon Update In India: देशात उशीरा सुरु झालेल्या मान्सूनमुळे जून महिन्यात काहीशी उसंत दिली. पण जुलै महिन्यात देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने थैमान घातलं.
Monsoon Update In India: बिपरजॉय चक्रिवादळामुळे देशात मान्सूनला (Monsoon) उशीर झाला तरीही जुलै महिन्यात मात्र पावसाने थैमान घातल्याचं चित्र सध्या आहे. देशातील आठ राज्यांमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान खात्याकडूनही अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे. माहितीनुसार, हवामान खात्याने आठ राज्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं आहे.
हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात 243.2 मिलीमीटर पाऊस पडला आहे. शनिवारीपासून (8 जुलै) उत्तर भारतातील अनेक राज्यात पावसाने थैमान घातलं आहे. मुसळधार पावसाने अनेक नवीन रेकॉर्ड देखील बनवले आहेत. दिल्लीमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये 153 मिमी पाऊस झाला आहे.
हरियाणा, पंजाब, चंढीगडला पावसाने झोडपून काढलं
हरियाणा, पंजाब आणि चंढीगडमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे. चंढीगडमधील मोहाली जिल्ह्यात पावसाने जराही उसंत घेतली नाही. तर पंजाब आणि हरियाणा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर पुढील चोवीस तास पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचं हवमान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
हिमाचल प्रदेशात देखील परिस्थिती तशीच
हिमाचल प्रदेशात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसानं कहर केला आहे. राज्याच्या विविध भागात भूस्खलनामुळे मोठं नुकसान झालं आहे. शिमला जिल्ह्यातील कुमारसैन भागात ढिगाऱ्याखाली दबल्याने एक जोडप्याचा आणि एका मुलाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले.
उत्तराखंडात पावसाचं थैमान
उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अर्लट जारी करण्यात आला आहे. तसेच भूस्खलन होण्याची शक्यता असल्याने योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. तसेच मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे. मुसळधार पावसामुळे उत्तराखंडातील जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये परिस्थिती बिकट
जम्मू आणि काश्मीरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तसचे जम्मू आणि काश्मीरमधील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी रस्ते खचल्याच्या दुर्घटना घडल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे.
या राज्यातील प्रशासनाकडून नागरिकांना तसेच पर्यटकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच जे पर्यटक फिरण्यासाठी आले आहेत त्यांनी त्यांचा प्रवास थांबवून सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन केले आहे. पावसामुळे अनेक राज्यांमध्ये शाळांना देखील सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.