Bihar Election Results 2020 | निकालानंतर एनडीएच्या विजयाचं श्रेय मोदींना तर नितीश कुमार चर्चेतून गायब!
बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच दिलं जात आहे. तर नितीश कुमार चर्चेतून पूर्णत: बाहेर आहेत. त्यामुळे निवडणूक जिंकूनही नितीश कुमार हरले का असा प्रश्न विचारला जात आहे.
पाटणा : 'मोदी से कोई बैर नहीं, नितीश तेरी खैर नहीं...' निवडणूक प्रचारात हा नारा दिला होता लोक जनशक्ती पक्षाच्या चिराग पासवान यांनी आणि बिहारच्या जनतेने तो खरा करुन दाखवला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार जरी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असले तरी निकालानंतर विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच दिलं जात आहे. तर नितीश कुमार चर्चेतून पूर्णत: बाहेर आहेत. त्यामुळे निवडणूक जिंकूनही नितीश कुमार हरले का असा प्रश्न विचारला जात आहे. जर मागील 15 वर्षांचा विचार केला तर नितीश कुमार यांची ही सर्वात वाईट कामगिरी आहे.
2005 च्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या पक्षाला 55 जागांवर विजय मिळाला होता. कोणालाही सत्ता स्थापन करण्यात यश आल्याने ऑक्टोबर 2005 मध्ये पुन्हा निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत जेडीयूला 88 जागांवर जबरदस्त विजय मिळाला होता. त्यावेळी जागांच्या बाबतीत नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष राज्यात पहिल्या क्रमांकावर होता. 2010 च्या निवडणुकीत जेडीयूच्या जागांमध्ये वाढ होऊन 115 झाली. मागील म्हणजेच 2015 च्या निवडणुकीत नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राजदशी हातमिळवणी केली आणि 71 जागावर ताबा मिळवला. परंतु यंदा जेडीयूला 50 जागाही मिळवता आल्या नाहीत.
जर स्ट्राईक रेटबाबत बोलायचं झालं तर 2010 च्या निवडणुकीत जेडीयूने 141 जागा लढवल्या होत्या. म्हणजे 82 टक्के जागांवर ताबा मिळवला होता. 2015 मध्ये नितीश कुमार यांनी 101 जागांवर आपले उमेदवार उतरवले होते, त्यापैकी 71 जागांवर यश मिळालं होतं. त्यांच्या यशाचा दर 70 टक्के होता. पण यंदा 115 जागांवर लढणाऱ्या जेडीयूला 43 जागांवर समाधान मानावं लागलं. म्हणजेच विजयाचा दर घसरुन केवळ 37 टक्के झाला आहे.
बिहार निवडणूक निकालाच्या विश्लेषणावरुन स्पष्ट होतं की नितीश कुमार यांच्या सरकारविरोधात लाट होती, भाजपविरोधात नाही. याच कारणामुळे 2015 च्या तुलनेत भाजपला 21 जागांचा फायदा झाला आहे. तर जेडीयूला 28 जागांचं नुकसान झालं आहे.
नितीश यांच्याविरोधात लाट असल्याचा अंदाज भाजपला आधीच आला होता. त्यामुळे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापर्यंत भाजपच्या पोस्टरवरुन नितीश कुमार गायब होते. एकीकडे तेजस्वी यादव यांचं 10 लाख नोकऱ्यांचं आश्वासन काल्पनिक असल्याचं नितीश कुमार सांगत होते, बिहारमध्ये उद्योग नसल्याचा दावा करत होते, त्याचवेळी भाजपने 19 लाख नोकऱ्या, मोफत कोरोना चाचणी यांसारखी आश्वासनं देऊन निवडणुकीचा हवा बदलली. भाजपच्या प्रचारात पंतप्रधान मोदींची एन्ट्री ही ट्रम्प कार्ड सिद्ध झाली.
नितीश कुमार यांना सर्वाधिक नुकसान चिराग पासवान यांनी पोहोचवलं. चिराग यांच्या पक्षाला एकाच जागेवर विजय मिळाला असला तरी एलजेपीच्या उमेदवारांमुळे जेडीयूच्या सुमारे डझनभर उमेदवारांना पराभूत व्हावं लागलं. नितीश कुमार यांनाही या निकालाचा अंदाजा आला असावा, त्यामुळेच की काय शांत स्वभावाचे समजले जाणारे नितीश कुमार सभेत मात्र आक्रमक दिसले.
नितीश कुमार चौथ्यांदा बिहारचे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतीलही पण यावेळी सरकार चालवणं त्यांच्यासाठी काटेरी मुकुट परिधान करण्यासारखंच असेल. कारण विरोधक आणि मित्रपक्षीही त्यांच्यापेक्षा ताकदवान आहे.
संबंधित बातम्या
2015 च्या तुलनेत बिहारमध्ये भाजपची भरारी, जदयू, काँग्रेसला मोठा फटका, तेजस्वी लहर कायम Tejashwi Yadav: तेजस्वी यादव एकटे लढले असते तर...!