एक्स्प्लोर
मैत्रीण फेसबुकवरुन व्हॉट्सअॅपपर्यंत आली, अन् 5 लाखांचा फटका देऊन गेली!
दिसायला सुंदर असणाऱ्या ज्युलियाचे फोटो पाहून रोहितने ताबडतोब फेसबुक रिक्वेस्ट स्वीकारली. मग काय... जे व्हायचं ते पुढे सुरु झालं. दोघांमध्ये कधी रोज, तर कधी दिवसाआड चॅटिंग सुरु झाली.

नवी दिल्ली : परदेशी अप्सरांच्या प्रेम कहाण्यांपासून ‘प्रेरणा’ घेत मेरठमधील रोहित हा तरुण चांगलाच फसला आहे. लंडनमधील तरुणीशी फेसबुकवरुन मैत्री केली, ही मैत्री व्हॉट्सअॅपपर्यंत आली. मात्र लंडनमधल्या या सौंदर्यवतीच्या हनीट्रॅपमध्ये रोहित कधी फसला, हे त्यालाच कळलं नाही आणि या ‘हनीट्रॅप’मुळे रोहितला 5 लाख रुपयांचा फटका बसला आहे. नेमकं काय झालं? मेरठच्या हस्तिनापूरमधील रोहितला गेल्या महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात लंडनमधील ज्युलिया मॉर्गन नामक महिलेची फ्रेण्ड रिक्वेस्ट आली. दिसायला सुंदर असणाऱ्या ज्युलियाचे फोटो पाहून रोहितने ताबडतोब फेसबुक रिक्वेस्ट स्वीकारली. मग काय... जे व्हायचं ते पुढे सुरु झालं. दोघांमध्ये कधी रोज, तर कधी दिवसाआड चॅटिंग सुरु झाली. चॅटिंगमधून रोहित आणि ज्युलियाची मैत्री फुलत गेली आणि एकेदिवशी ज्युलियाने रोहितला आपला व्हॉट्सअॅप नंबरही दिला. एवढेच नव्हे, तुला भेटायचे आहे, असेही ज्युलिया रोहितला म्हणाली. मग काय रोहित सातवे आसमाँ पर वगैरे होता. फेसबुकवरुन व्हॉट्सअॅपर्यंत आलेल्या ज्युलियाच्या मनात नेमकं काय होतं, हे रोहितला एव्हाना कळले नव्हते. त्यामुळे तो तिच्यात पार गुंतत गेला. ...आणि रोहित फसत गेला! भारतात आल्यावर खर्चासाठी काही रक्कम पार्सलच्या माध्यमातून पाठवली आहे. त्या रकमेतील ठराविक रक्कम तुलाही कमिशन म्हणून देईन, असे ज्युलियाने 4 जुलै 2018 रोजी रोहितला कळवले. ज्युलियाच्या बोलण्यावर एव्हाना रोहितला प्रचंड विश्वास वाटू लागला होता. त्यामुळे अर्थात तो तिच्या बोलण्यात अडकला आणि ज्युलियाच्या सांगण्यानुसार त्याने काम सुरु केले. ज्युलियाने पार्सलचं ट्रॅकिंग नंबर आणि डिटेलही रोहितला दिली. पार्सलसाठी ड्युटी टॅक्स 28 हजार रुपये भरावे लागतील, असेही सांगितले. दोन दिवसांनंतर रोहितला पुन्हा फोन आला आणि पार्सलमध्ये परदेशी करन्सी असल्याने कस्टम विभागाने पार्सल जप्त केल्याचे कळवण्यात आले. पार्सल मिळवण्यासाठी अडीच लाख रुपये टॅक्स द्यावे लागेल, असे ब्रिटिश दूतवासाच्या कथित अधिकाऱ्याने सांगितले. त्याने एका खात्यात अडीच लाखांची रक्कम पाठवण्यास सांगितले.रोहितने अडीच लाख रुपये पाठवले. दुसऱ्यांदा अडीच लाख रुपये कस्टम ड्युटी भरण्यासाठी जो कॉल आला, त्यावेळी सांगण्यात आले की, पार्सलमध्ये 40 लाख रुपये आहेत. आता 40 लाख मिळणार असतील, तर अडीच लाखांचा टॅक्स भरण्यात काय वावगं आहे, असे म्हणत रोहितने पुन्हा अडीच लाख भरले. पार्सलमधील या रकमेतील काही रक्कम कमिशन म्हणून रोहितला देण्याचे ज्युलियाने आश्वासन दिले होते. त्यामुळे रोहित गपचूप टॅक्सच्या नावाखाली उकळली जाणारी रक्कम भरत होता. शिवाय ज्युलियाचे प्रेमही कारणीभूत होते. दोनवेळा अडीच लाख रुपये कथित ब्रिटिश दूतवासाच्या अधिकाऱ्याच्या अकाऊंटमध्ये भरल्यानंतरही पार्सल मिळालं नाही, शिवाय ज्युलियाशी चॅटिंगही झाली नाही, तेव्हा रोहितचे डोळे उघडले आणि आपल्याला फसवल्याचे त्याच्या लक्षात आले. आता पोलिस ठाण्याच्या फेऱ्या रोहित आता मेरठ पोलिस ठाण्याच्या फेऱ्या मारत असून, ज्युलियाविरोधात लिखित तक्रार दाखल केली आहे. रोहितने तक्रार अर्जात ते नंबरही दिले आहेत, ज्याद्वारे त्याला वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले गेले. हे सारं प्रकरण ऑनलाईन फ्रॉड आणि हनीट्रॅपचा आहे, असा पोलिसांचा अंदाज आहे. तसेच, सायबर सेलकडे रोहितचे प्रकरण तपासासाठी सोपवण्यात आले असून, ज्युलियापर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल, असे एएसपी सतपाल अंतिल यांनी सांगितले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत























