Medha Patkar : मेधा पाटकर दोषी! 24 वर्षांपूर्वीच्या बदनामीच्या गुन्ह्यामध्ये दिल्ली न्यायालयाचा निकाल
Medha Patkar Defamation Case: सध्याचे दिल्लीचे नायब राज्यपाल असलेल्या व्हीके सक्सेना यांनी 2001 साली मेधा पाटकर यांच्याविरोधात बदनामीचा दावा दाखल केला होता.
नवी दिल्ली: नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या (Narmada Bachao Andolan) आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar) यांना दिल्लीच्या साकेत न्यायालयाने 2001 सालच्या एका प्रकरणात दोषी ठरवलं आहे. दिल्लीचे सध्याचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना (Delhi Lt Governor VK Saxena) यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात मेधा पाटकर यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. व्हीके सक्सेना यांनी मेधा पाटकर यांच्यावर खोटे आरोप, उपहासात्मक वक्तव्ये आणि बदनामी केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. व्हीके सक्सेना यांनी गुजरातच्या संसाधनांचा परकीय हितसंबंधासाठी वापर केल्याचा आरोप मेधा पाटकर यांनी केला होता.
सक्सेना यांच्याविरोधात मेधा पाटकर यांनी केलेली वक्तव्ये केवळ बदनामीकारकच नाहीत, तर ती नकारात्मक गोष्टींना चालना देतात असं निरीक्षण दिल्ली न्यायायलाने नोंदवलं आहे. न्यायालयाचे म्हणणे आहे की, मेधा पाटकर यांनी केवळ व्हीके सक्सेना यांची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी चुकीची माहिती देऊन आरोप केले होते, हे नि:संदिग्धपणे सिद्ध झाले आहे.
न्यायालयाने काय म्हटलंय?
मेधा पाटकर यांनी आयपीसीच्या कलम 500 अंतर्गत दंडनीय गुन्हा केला असून त्या दोषी ठरतात. त्यांनी जाणूनबूजून तक्रारदाराची बदनामी केली. मेधा पाटकरांनी जे काही आरोप केले ते फक्त तक्रारदाराची बदनामी करण्यासाठीच होते. मेधा पाटकरांच्या कृतींमुळे लोकांच्या नजरेत सक्सेना यांची प्रतिष्ठा आणि त्यांच्या विश्वासार्हतेला खरोखरच मोठे नुकसान झाले आहे.
सक्सेना यांना भ्याड संबोधणाऱ्या आणि हवाला व्यवहारात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप करणाऱ्या मेधा पाटकर यांची वक्तव्यं केवळ बदनामीकारकच नाहीत तर ती तक्रारदाराबद्दल नकारात्मकता निर्माण करण्यासाठीही केली गेली आहेत. व्हीके सक्सेना यांनी गुजरातमधील संसाधने परकीय हितसंबंधांसाठी गहाण ठेवल्याचा आरोप म्हणजे त्यांची सार्वजनिक जीवनातील बदनामी करण्याचा प्रकार आहे.
काय प्रकरण आहे?
मेधा पाटकर आणि दिल्लीचे सध्याचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांच्यातील संघर्ष हा 25 वर्षांपासूनचा आहे. 2003 साली सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर नर्मदा बचाव आंदोलनात सक्रिय होत्या. तर त्यावेळी व्ही के सक्सेना नॅशनल कौन्सिल फॉर सिव्हिल लिबर्टीजच्या माध्यमातून सक्रिय होते. त्यावेळी त्यांनी मेधा पाटकर यांच्या आंदोलनाला व्हीके सक्सेना यांनी कडाडून विरोध केला होता.
मेधा पाटकर यांनी व्हीके सक्सेना यांच्या विरोधात आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या विरोधात जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल मानहानीचा खटला दाखल केला होता. तर दुसरीकडे व्हीके सक्सेना यांनी आपल्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल मेधा पाटकर यांच्यावर मानहानीचे दोन खटले दाखल केले होते.
ही बातमी वाचा :