(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covid-19 Nasal Vaccine : नाकावाटे दिला जाणार कोरोनाचा बूस्टर डोस, तज्ज्ञ समितीकडून लसीच्या वापराला मंजुरी
Mansukh Mandaviya On Nasal Vaccine : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे की, देशभरातील रुग्णालयांना ऑक्सिजन आणि औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Coronavirus Booster Dose : भारतात आता नाकावाटे कोरोना लसीचा (Nasal Corona Vaccine) बूस्टर डोस (Booster Dose) दिला जाणार आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या समितीकडून नेझल कोरोना वॅक्सिनचा बूस्टर डोस म्हणून वापर करण्यास मंजुरी दिली आहे. एकीकडे जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. जगात ओमायक्रॉन आणि त्याचा BF.7 सबव्हेरियंट याचा वेगाने संसर्ग होत आहे. भारतातही ओमायक्रॉनच्या सबव्हेरियंटचे तीन रुग्ण सापडल्याने प्रशासन अलर्टवर आलं आहे. केंद्र सरकारकडून कोरोना संदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठकांचा धडाका सुरु आहे. केंद्र सरकारने बुधवारपासून कोरोनाबाबत अनेक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
तज्ज्ञांच्या समितीकडून नेझल कोरोना वॅक्सिन मंजुरी
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी सांगितले की, कोरोना संदर्भातील आरोग्य तज्ज्ञांच्या समितीने प्रौढांसाठी नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला मंजुरी देत बूस्टर डोस म्हणून नेझल कोरोना वॅक्सिनची शिफारस केली आहे. आरोग्यमंत्र्यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नेझल वॅक्सिनला तज्ज्ञांच्या समितीने 18 वर्षांवरील नागरिकांवरील वापरासाठी मंजुरी दिल्याचं सांगितलं आहे. मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत सांगितले की, आता तज्ज्ञांच्या समितीनेही नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे, यामुळे येत्या काही दिवसांत कोणत्याही व्यक्तीला इंजेक्शनद्वारे कोरोना लस घेण्याची गरज भासणार नाही आणि थेट नाकावाटे कोरोना लस देण्यात येईल.
DCGI कडून लसीला परवानगी
औषध नियामक प्रशासनाने (DCGI) ने याआधीच भारत बायटेकच्या नेझल वॅक्सिनला मंजुरी दिली होती. भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) ChAd36-SARS-CoV-S COVID-19 नेझल वॅक्सिनला आपात्कालीन वापरासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये मंजुरी देण्यात आली. भारत बायोटेकच्या BBV-154 इंट्रानॅसल लशीला DGCI ने आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मंडविया यांनी दिली होती. नाकावाटे दिली जाणारी (Nasal vaccine) ही भारताची पहिली लस आहे. ही लस 18 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना देण्यात येईल आहे.
भारत बायोटेकची इंट्रानेझल कोविड लस
दरम्यान, 28 नोव्हेंबर रोजी भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने जाहीर केले होते की, इन्कोव्हॅक (iNCOVACC BBV154) ही नाकावाटे दिली जाणारी जगातील पहिली कोरोना लस बनली आहे. याला इंट्रा-नेझल कोविड लस असं म्हणतात. भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार, ही लस साठा आणि वितरणासाठी iNCOVACC दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानात ठेवता येते. नाकातून दिली जाणारी ही लस खास कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी तयार करण्यात आली आहे. अमेरिकेतील सेंट लुईस, मिसूरी येथील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या भागीदारीत ही लस विकसित करण्यात आली आहे.