Intranasal Covid Vaccine: कोरोनाच्या लढाईत मोठं यश; Nasal Vaccine तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत प्रभावी
Intranasal Covid Vaccine: भारत बायोटेकने विकसित केलेली नाकावाटे घेण्यात येणाऱ्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. ही लस प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे चाचणीत दिसून आले.
Intranasal Covid Vaccine: संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना दुसरीकडे कोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठे यश हाती आले आहे. भारत बायोटेक कंपनीने कोरोनाच्या BBV-154 इंट्रानसाल लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी (Coronavirus Vaccine Trials) पूर्ण झाली आहे. ही लस बुस्टर डोस म्हणून देण्यात येण्याची शक्यता आहे. ही लस नाकावाटे (Nasal Vaccine) देण्यात येणार आहे.
BBV-154 इंट्रानसाल लशीची पहिली आणि तिसरी चाचणी पूर्ण करण्यात आली होती. चाचणी दरम्यान, ही लस पहिला आणि दुसरा डोस म्हणून लस देण्यात आली होती. ही लस चाचणी पूर्ण झाल्यानंतर बुस्टर डोस म्हणूनदेखील या लशीची चाचणी करण्यात आली. बुस्टर डोस म्हणून चाचणी करताना ज्यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा व्यक्तींवर चाचणी करण्यात आली.
तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीतील आकडेवारी राष्ट्रीय नियामक प्राधिकरणाकडे पाठवण्यात येणार आहे. पहिल्या डोसच्या चाचणीसाठी अनेक पातळीवर चाचणी करण्यात आली होती. या दरम्यान सुरक्षा आणि इम्युनोजेनेसिटीच्या प्रत्येक पैलूंची तपासणी करण्यात आली होती. याची तुलना COVAXINO सोबत करण्यात आली. भारत बायोटेकने संपूर्ण भारतात 14 ठिकाणी लस चाचणी केली होती.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील चाचणीत निरोगी स्वयंसेवकांना लस देण्यात आली होती. त्यामुळे लशीचा चांगला परिणाम दिसून आला. कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसले नाहीत. ही लस सुरक्षित आणि प्रभावी ठरण्याचे संकेत दिसून आले.
Intra Nasal Vaccine च्या बुस्टर डोससाठी 9 ठिकाणी चाचणी करण्यात आली. भारत बायोटेकची ही लस नाकावाटे देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने मागील वर्षी मिशन कोव्हिड सुरक्षा सुरू केली होती. कोरोना लशीवर अधिक वेगाने काम करता यावे, यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली. सामान्यांना एक सुरक्षित, प्रभावी, स्वस्त दरात लस उपलब्ध होईल यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली होती.
रविवारी राज्यात 2082 कोरोना बाधितांची नोंद
राज्यात रविवारी 2082 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 1824 रूग्णांनी कोरोनावर मात केली. आजपर्यंत राज्यात 79, 12, 067 रूग्णांनी कोरोनावर मात केलीय. त्यामुळे राज्यातील रूग्णा बरे होण्याचे प्रमाण 98.01 टक्के झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1. 83 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 12 हजार 102 रूग्ण सक्रिय आहेत. यात मुंबईत सर्वात जास्त म्हणजे 5 हजार 41 रूग्ण सक्रिय आहेत. मुंबईपाठोपाठ ठाण्यात 1467 रूग्ण सक्रिय आहेत.