Manoj Jarange Patil: न्याय द्यावाच लागेल, नाहीतर महागात पडेल; मराठ्याचं लेकरू आहे म्हणून कारवाई करत नाहीये का? मनोज जरांगेंचा शौर्य पाटील प्रकरणी संताप
Manoj Jarange Patil on Shaurya Patil Case: दिल्लीत आत्महत्या केलेल्या शौर्य पाटील या विद्यार्थ्याच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील दिल्लीत दाखल झालेत.

Manoj Jarange Patil on Shaurya Patil Case: दिल्लीतील (Delhi) सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून दहावीत शिकत असलेल्या मराठी विद्यार्थ्याने मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली होती. शौर्य प्रदीप पाटील (Shaurya Patil), असे विद्यार्थ्याचे नाव असून तो नवी दिल्लीतील राजीवनगर भागात राहत होता. शौर्य प्रदीप पाटील हा मूळचा सांगली (Sangli) जिह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे दिल्ली दौऱ्यावर असून ते शौर्य पाटील या विद्यार्थ्याच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत. या प्रकरणात केंद्र सरकारने तात्काळ कारवाई करावी, दोषी शिक्षकांवर कारवाई करावी, तसेच संबंधित शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. तसेच मराठ्याचं लेकरू आहे म्हणून कारवाई करत नाहीये का? असा संतप्त सवाल देखील मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय.
Manoj Jarange Patil: नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?
मनोज जरांगे पाटील एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, न्याय द्यावाच लागेल, नाहीतर महागात पडेल. शाह साहेबांना आम्ही सांगतो. मराठ्याचं लेकरू आहे म्हणून कारवाई करत नाहीये का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तर महाराष्ट्रात चिठ्ठीत नाव असलं की मुख्यमंत्री कारवाई करतात, मग केंद्रीय गृहमंत्री का कारवाई करत नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
Shaurya Patil : नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, शौर्य प्रदीप पाटील हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील रहिवासी होता. त्याचे वडील प्रदीप पाटील हे सोने–चांदी गलाई व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून दिल्ली येथे स्थायिक आहेत. त्यामुळे शौर्य कुटुंबासह नवी दिल्लीतील राजीव नगर परिसरात वास्तव्यास होता. तो दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होता. मंगळवार, 18 नोव्हेंबर रोजी शौर्यने राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली. शाळेतील काही शिक्षिकांकडून मानसिक छळ होत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख शौर्यने दीड पानांच्या सुसाइड नोटमध्ये केला आहे. या प्रकरणी राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल तसेच शिक्षिका मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या शौर्यला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा























