अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष रंजीत बच्चन यांची दिवसाढवळ्या हत्या
अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष रंजीत बच्चन यांची लखनौ येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. रंजीत बच्चन यांच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.
लखनौ : अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष रंजीत बच्चन यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. रंजीत बच्चन लखनौमधील हजरतगंज परिसरात सकाळी फेरफटका मारण्यासाठी गेले असताना ही घटना घडली आहे. बाईकवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. लखनौमधील हजरतगंज परिसरात राजकीय नेत्यांसह अनेक नामवंत व्यक्ती राहतात. राज्याची विधानसभादेखील याच परिसरात आहे. या परिसरात ही घटना घडल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रविवारी सकाळी 6.30 वाजता ही घटना घडली. रंजीत बच्चन आपल्या घरातून निघून आपल्या मित्रासोबत ग्लोब पार्कमध्ये मॉर्निग वॉकसाठी गेले होते. यावेळी बाईकवरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी रंजीत यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर रंजीत बच्चन यांचे मित्रही या गोळीबारात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ट्रॉमा सेंटर येथे उपचार सुरु आहेत. बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार करुन तेथून पळ काढला. रंजीत बच्चन समाजवादी पक्षासाठी सांस्कृतिक कार्यक्रमही करत असत.
घटनेची माहिती मिळतात पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रंजीत बच्चन यांच्या हत्यारांचा पोलिसांनी शोध सुरु केला असून त्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. हल्लोखोर शहराबाहेर जाऊ नयेत यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केला आहेत. त्यासाठी शहरातील सर्व चेक पोस्ट अलर्ट करण्यात आले आहेत.
या घटनेनंतर समाजवादी पक्षाने योगी सरकारवर टीका करत योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. समाजवादी पक्षाने ट्वीट करत म्हटलं की, "लखनौमध्ये दिवसाढवळ्या हिंदू महासभेच्या अध्यक्षाची हत्या झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. उत्तर प्रदेशमधील सरकार आणि पोलिसांवरचा विश्वास उडाला आहे. सरकारने त्वरित राजीनामा द्यावा."
गेल्या वर्षी हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. लखनौ येथील नाका हिंडोला परिसरातील घरात घुसून त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील सर्व आरोपींना अटक झाली आहे.