लोक जनशक्ती पक्षाचे खासदार प्रिन्स राज यांच्यावर बलात्काराचा आरोप, कोर्टाच्या आदेशावरुन दिल्लीत गुन्हा दाखल
लोक जनशक्ती पक्षाचे खासदार प्रिन्स राज यांच्यावर बलात्काराचा आरोप. तीन महिन्यांपूर्वी पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. परंतु, पोलिसांनी कारवाई केली नाही. यानंतर पीडितेने न्यायालयात धाव घेतली.
नवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाचे खासदार प्रिन्स राज यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलीस स्टेशनमध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर बलात्काराचा हा गुन्हा नोंदवण्यात आला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. खासदार प्रिन्स राज हे चिराग पासवान यांचे चुलत भाऊ आहेत.
तीन महिन्यांपूर्वी पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. परंतु, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. यानंतर पीडितेने न्यायालयात धाव घेतली. कोर्टाने कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यानंतर खासदार प्रिन्स राज यांच्याविरोधात बलात्काराच्या कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मात्र, जेव्हा पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार केली, तेव्हा खासदार राजकुमार राज यांनीही पीडितेच्या विरोधात तक्रार केली होती.
लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) संस्थापक आणि दिवंगत नेते रामविलास पासवान यांच्या पहिल्या जयंती दिनानिमित्त चिराग पासवान यांनी 12 सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी छापलेल्या कार्डवर काका पशुपती पारस आणि चुलत भाऊ राजकुमार राज यांची छापली होती. पशुपती पारस आणि राजकुमार राज या दोघांनीही चिराग पासवान यांच्याकडे पाठ फिरवली आहे.
गेल्या वर्षी जेव्हा त्यांची पहिली पुण्यतिथी साजरी करण्यात आली, तेव्हा संपूर्ण कुटुंबाने त्यांना एकत्र श्रद्धांजली वाहिली. परंतु, यावेळी कुटुंबातील सुरू असलेल्या राजकीय भांडणाने ते होऊ दिले नाही. पशुपती पारस यांनी रामचंद्र पासवान यांचे पुत्र आणि खासदार राजकुमार राज यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी श्रद्धांजली वाहिली. ज्या बंगल्यात रामचंद्र पासवान राहत असत तिथच पशुपती पारस राहतात.
त्यावेळी माध्यमांशी बोलताना पशुपती पारसही भावूक झाले होते. आपला मोठा भाऊ रामविलास पासवान आणि लहान भाऊ रामचंद्र पासवान यांची आठवण करून देताना ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत दोन भाऊ गमावणे हा त्यांच्यासाठी वेदनादायक अनुभव होता. चिराग पासवान यांच्याशी सुरू असलेल्या राजकीय भांडणात पारस म्हणाले की, त्यांच्यासाठी स्वतःचा मुलगा आणि रामचंद्र पासवान यांचे पुत्र आणि चिराग पासवान यांच्यात काही फरक नाही. पारस म्हणाले की चिराग पासवान अजून पुढे जावो हिच इच्छा आहे.