Landslide in Sikkim : जोरदार पावसामुळे सिक्कीमच्या लाचुंग आणि लाचेन खोऱ्यात भूस्खलन, लष्कराच्या जवानांनी पार पाडली बचाव मोहिम
Landslide in Sikkim: सिक्कीममध्ये अडकलेल्या प्रवाशांमध्ये अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 113 महिला आणि 54 बालकांचा समावेश होता. त्यांना तीन वेगळ्या भारतीय लष्कराच्या तळावर नेण्यात आले.
Landslide in Sikkim: सिक्कीमच्या (Sikkim) उत्तर भागात शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसामुळे (Heavy Rainfall) भूस्खलन झाले. यामध्ये अनेक पर्यटक अडकले होते. परंतु त्यानंतर भारतीय लष्कराने बचाव कार्य पार पाडून 500 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. या प्रवाशांमध्ये 113 महिला आणि 54 बालकांचा समावेश होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (19 मे) जोरदार पावसामुळे भूस्खलन होऊन रस्त्यांना तडे गेले. त्यानंतर लाचुंग आणि लाचेन खोऱ्यात जवळपास 500 प्रवासी अडकले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या जवानांनी पर्यटकांना सुखरुप बाहेर काढल्यानंतर त्यांना राहण्यासाठी तसेच विश्रांती करण्यासाठी लष्कराचा तळ दिला. तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टरांची टीम देखील लष्कराने बोलावली. पुढे त्यांनी सांगितले की, अडकलेल्या प्रवाश्यांमध्ये 216 पुरुष, 113 महिला आणि 54 बालकांचा समावेश होता. तसेच या सर्वांना तीन वेगळ्या लष्कराच्या तळांमध्ये नेण्यात आले.
'पर्यटकांना सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल'
अडकलेल्या प्रवाश्यांना सुखरुप बाहेर काढल्यानंतर एका महिलेने डोकेदुखी आणि चक्कर येत असल्याचं सांगितलं. त्यानंतर लष्कराने डॉक्टरांची टीम बोलावली आणि त्या महिलेल्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यासाठीचे प्रयत्न सुरु असल्याचं देखील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तसेच त्यांनी सांगितले की, 'पुढील मार्ग सुरळीत होईपर्यंत पर्यटकांना सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल.' त्यामुळे प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन प्रशासनाकडून आणि लष्कराकडून करण्यात येत आहे.
याआधी भारतीय लष्कराच्या जवानांनी सिक्कीममध्ये झालेल्या बर्फवृष्टीमधून नाथुला आणि त्सोमगो झीलवरुन गंगटोकला जाणाऱ्या प्रवाशांना देखील सुखरुप बाहेर काढले होते. या दुर्घटनेमध्ये 900 प्रवासी अडकले होते. हे बचाव कार्य पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून त्रिशक्ती कोरच्या जवानांनी केले होते. त्यांनी तात्काळ तिथून 900 प्रवाशांना बाहेर काढत बचाव कार्य पार पाडले होते. या मोहिमेला 'ऑपरेशन हिमराहत' असे नाव दिले होते.
#WATCH | Sikkim: Indian Army rescues 500 tourists who were stranded at Chungthang due to landslides and roadblocks after massive rainfall
— ANI (@ANI) May 20, 2023
..."Indian army helped us, gave shelter. They gave us dinner, breakfast & place to sleep...we thank Indian Army", says a tourist rescued by… pic.twitter.com/GpJuLmtgri