(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hardik Patel : पाटीदार आंदोलन ते भाजप व्हाया काँग्रेस; 'असा' आहे हार्दिक पटेल यांचा राजकीय प्रवास
Hardik Patel: हार्दिक पटेल यांचा पाटीदार आंदोलनापासून सुरू झालेला राजकीय प्रवास आता काँग्रेस मार्गे भाजपमध्ये पोहचला आहे. जाणून घेऊयात हार्दिक यांच्या राजकीय प्रवासाबाबत..
Hardik Patel: कधीकाळी भाजपवर निशाणा साधाणारे काँग्रेसचे माजी नेते हार्दिक पटेल आज भारतीय जनात पक्षात सहभागी होणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्याआधीच हार्दिक पटेल भाजपात प्रवेश करणार आहेत. राज्यात 20 वर्षांहून अधिक काळ भाजपची सत्ता आहे. हार्दिक यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना धक्का बसला असल्याचे म्हटले जात आहे.
पाटीदार आंदोलनाचा चेहरा
2015 मध्ये गुजरातमध्ये शासकीय नोकरी आणि शिक्षणात पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन सुरू झाले होते. या आंदोलनाचा मुख्य चेहरा हार्दिक पटेल होते. संपूर्ण गुजरातमध्ये हे आंदोलन पेटले होते. या आंदोलनाचे नेतृत्व हार्दिक पटेलकडे असल्याने अनेकांच्या नजरा 28 वर्षीय हार्दिककडे वळल्या होत्या. या आंदोलनात काही ठिकाणी हिंसाचारही उफाळून आला होता. एका आंदोलनातील हिंसाचारा दरम्यान एका पोलिसासह 10 जणांचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय सार्वजनिक मालमत्तांचेही मोठे नुकसान झाले होते.
त्यानंतर हार्दिक पटेलविरोधात आयपीसी 124(ए), 121(ए) आणि 120 (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 2016 पासून हार्दिक पटेल जामिनावर आहेत. राज्यातील भाजप सरकारनेदेखील 2015 मधील आरक्षण आंदोलनाच्याबाबतीत हार्दिक पटेल आणि इतरांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
पटेल नवनिर्माण सेना
कुर्मी, पाटीदार आणि गुर्जर समुदायाचा समावेश ओबीसींमध्ये करावा आणि त्यांना सरकारी नोकरी देण्याच्या मागणीसाठी हार्दिक पटेल यांनी 9 सप्टेंबर 2015 मध्ये पटेल नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. त्याच वर्षी 18 ऑक्टोबर रोजी हार्दिक पटेलविरोधात राष्ट्रध्वाजाचा अपमान करण्याचा आरोप लावण्यात आला होता.
गुजरात निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा
हार्दिक पटेलने काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी 2017 मध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला होता. या विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेलशिवाय अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी यांच्या मदतीने काँग्रेस पूर्ण उत्साहात मैदानात उतरली होती. काँग्रेसला काही जागांवर निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. विधानसभा निवडणुकीनंतर ठाकोर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
काँग्रेसमध्ये सहभागी
मार्च 2019 मध्ये अहमदाबाद येथे काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत तत्कालीन पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हार्दिक पटेलने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
लोकसभा निवडणूक लढवता आली नाही
मेहसाणा दंगल प्रकरणी जुलै 2018 मध्ये सत्र न्यायालयाने हार्दिक पटेल यांना दोषी ठरवले होते. यानंतर हार्दिकने गुजरात हायकोर्टात जाऊन शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळल्याने ते निवडणूक लढवू शकला नाही. त्यानंतर हार्दिकने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र तेथूनही दिलासा मिळाला नाही.
गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष
जुलै 2020 मध्ये, काँग्रेसच्या अंतरीम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हार्दिक पटेल यांची गुजरातचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून मला आव्हानात्मक जबाबदारी देण्यात आली आहे. यावरून हे देखील स्पष्ट होते की पक्ष सामान्य पार्श्वभूमीतील लोकांना प्रोत्साहन देतो आणि 2022 मध्ये काँग्रेस दोन तृतीयांश बहुमताने सत्तेवर येईल असा विश्वास त्यावेळी हार्दिक पटेल यांनी व्यक्त केला होता.