एक्स्प्लोर
कोण होते राज्यपाल रामलाल, त्यांनी काय केलं होतं?
राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी 'का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे.' असं म्हटलंय. हे राज्यपाल रामलाल कोण आहेत. जाणून घ्या.
मुंबई : 'राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!' असं ट्वीट शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना आज केलं. राऊत यांच्या ट्वीटमध्ये राज्यपाल रामलाल यांचा उल्लेख आहे. कोण होते हे राज्यपाल रामलाल, ते कुठले राज्यपाल होते, त्यांनी काय केलं होतं..
तर हे राज्यपाल रामलाल म्हणजे ठाकूर रामलाल. ते हिमाचल प्रदेशमधील राजकारणी होते. काँग्रेसचे नेते. 28 जानेवारी 1977 रोजी ते हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. ते दोनदा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. 1957, 1962, 67, 77, 80 आणि 1982 या विधानसभा निवडणुकांत ते जिंकले. झुबल कोटखाई हा त्यांचा परंपरागत मतदारसंघ.
विकीपिडियाच्या नोंदीनुसार त्यांचा जन्म 7 जुलै 1929 आणि मृत्यू 6 जुलै 2002 असा आहे.
पण खासदार संजय राऊत यांनी रामलाल यांचा उल्लेख मुख्यमंत्री किंवा सतत निवडून येणारे राजकारणी म्हणून केलेला नाहीय. तर तो केलाय राज्यपाल म्हणून.. ते आंध्रप्रदेशचे राज्यपाल होते. त्यांची सर्वाधिक वादग्रस्त कारकीर्द आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणूनच राहिलीय. 15 ऑगस्ट 1983 ते 29 ऑगस्ट 1984 या काळात ते आंध्रातील राजभवनात होते.
आंध्रप्रदेशचे राज्यपाल असताना, तिथले लोकनियुक्त मुख्यमंत्री एनटी रामाराव अमेरिकेत वैद्यकीय उपचारासाठी गेलेले असताना त्यांनी रामा राव यांच्याच मंत्रिमंडळातील अर्थमंत्री एन भास्करराव यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करुन त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. अर्थातच राज्यपाल रामलाल यांनी हा बदल दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसारच केलेला होता.
खरं तर अर्थमंत्री एन भास्करराव यांना त्यावेळच्या 20 टक्के तेलुगु देसम आमदारांचाही पाठिंबा नव्हता.
आठवड्याभरानंतर अमेरिकेतील वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यावर एनटी रामाराव हैदराबादला परतल्यावरही त्यांना पुन्हा मुख्यमंत्री मानण्यास राज्यपालांनी नकार दिला.
मग एनटी रामाराव यांनी काँग्रेस आणि राज्यपाल रामपाल यांच्याविरोधात राज्यव्यापी निषेध आंदोलन छेडलं. आंदोलनाच्या तब्बल एक महिन्यानंतर राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंह यांनी आंध्रचे राज्यपाल ठाकूर रामलाल यांना बडतर्फ केलं. त्यानंतर तीन दिवसांनी पुन्हा एकदा एनटी रामाराव यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पूर्ण झाला.आंध्रचे तत्कालीन ठाकूर रामलाल यांच्या मृत्यू हिमाचल प्रदेशची राजधानी सिमल्यात ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. रामलाल यांच्या परंपरागत विधानसभा मतदारसंघातून त्यांचा नातू रोहित ठाकूर आता हिमाचल विधानसभेवर आमदार म्हणून निवडून येतात.
आंध्र प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल ठाकूर रामलाल यांनी पूर्ण बहुमतात असलेल्या तत्कालीन एनटी रामाराव यांना पदच्युत करुन त्यांचे पक्षांतर्गत विरोधक असलेल्या एन भास्कर राव यांना मुख्यमंत्री केल्याची दखल त्यावेळी न्यूयॉर्क टाईम्सनेही घेतली होती. त्यावेळी इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या. तर आंध्रात एनटी रामाराव यांचं बिगर काँग्रेसी सरकार होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement