Delhi Kisan Garjana Rally: दिल्लीच्या रामलीला मैदानात जमले 50 हजार शेतकरी, केंद्र सरकारकडे केली 'ही' मागणी
Delhi Kisan Garjana Rally: केंद्राचे तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनंतर शेतकरी पुन्हा एकदा सोमवारी दिल्लीत मोठ्या संख्येने जमले होते.
Delhi Kisan Garjana Rally: केंद्राचे तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनंतर शेतकरी पुन्हा एकदा सोमवारी दिल्लीत मोठ्या संख्येने जमले होते. भारतीय किसान संघाच्या 'किसान गर्जना' रॅलीत सहभागी होण्यासाठी देशभरातून हजारो शेतकरी दिल्लीतील रामलीला मैदानावर पोहोचले होते. किसान गर्जना रॅलीत शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारसमोर मांडण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर येणाऱ्या काळात त्यांच्यावर संकट येऊ शकते, असे यावेळी शेतकरी नेते म्हणाले आहेत.
भारतीय किसान संघाने म्हटले आहे की, दिल्लीतील रामलीला मैदानावर (Delhi, Ramlila Maidan) 560 जिल्ह्यांतील 60,000 गाव समित्यांमधील सुमारे 1 लाख शेतकरी रामलीला मैदानावर जमले आहेत. हे सर्व शेतकरी स्वतःहून आले आहेत. यावेळी शेतकरी नेत्यांनी या रॅलीच्या माध्यमातून केंद्र सरकारला कृषीविषयक कायदे मागे घेताना दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे. किसान गर्जना रॅलीसाठी देशभरातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात आली होती. त्यासाठी 20 हजार पदयात्रा, 13 हजार सायकल यात्रा आणि 18 हजार पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते.
शेतकऱ्यांच्या रॅलीवर बोलताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी म्हणाले की, शेतकऱ्यांनी आमच्याकडे आपल्या मागण्या मांडल्या आहेत. सरकार प्रत्येक आवश्यक आणि संवेदनशील पद्धतीने याचा विचार करेल. ते म्हणाले, जमलेल्या आमच्या शेतकरी बांधवांच्या निवेदनाची माहिती आम्हाला मिळाली आहे. भारत सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत संवेदनशील आहे. हे मोदी सरकार आहे. जी फक्त शेतकऱ्यांसाठी बनवली आहे. म्हणूनच त्यांच्या हितासाठी आम्ही काम करत राहणार. आधीच्या सरकारांनी काम केले असते तर आज शेतकऱ्यांना अशा समस्यांना सामोरे जावे लागले नसते.
Delhi Kisan Garjana Rally: काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?
वाढत्या महागाईमुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी भारतीय किसान संघाने केली आहे. भारतीय किसान संघाची मागणी आहे की, शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या मालावरील जीएसटी हटवण्याबरोबरच शेत पिकांना योग्य हमी भाव द्यावा. किसान सन्मान निधीमध्ये मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात यावी. नद्या जोडून प्रत्येक शेतीला सिंचनाचे पाणी उपलब्ध करून द्यावे, या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.
इतर महत्वाची बातमी: