(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Election Results 2021: सुरुवातीच्या कलानुसार केरळमध्ये डाव्यांना स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता
केरळमध्ये सर्व जागांचे सुरुवातीचे कल हाती आले असून डाव्यांना स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. डावे सध्या 79 जागांवर आघाडीवर आहेत.
तिरुअनंतपूरम: पाच राज्यांच्या निवडणूकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सर्वांचे लक्ष केरळ आणि पश्चिम बंगालकडे लागले आहेत. ,सुरुवातीच्या कलानुसार या दोन राज्यांत सत्तेत काही बदल होण्याची शक्यता नाही. केरळमध्ये सुरुवातीचे सर्व कल हाती आले असून डाव्यांना स्प्ष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. डावे पक्ष सध्या 79 जागांवर आघाडीवर आहेत तर काँग्रेस 59 जागांवर आघाडीवर आहे.
केरळमध्ये विधानसभेची एकूण संख्या 140 आहे आणि बहुमताचा आकडा 71 आहे. एक्झिट पोलच्या निकालांमधून असं दिसून येत आहे की एलडीएफच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापन होऊ शकते.
केरळमध्ये काँग्रेस 59 जागांवर आघाडीवर असून भाजप एका जागेवर आघाडीवर आहे. सुरुवातीच्या कलानुसार मुख्यमंत्री पिनराई विजयन आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. भाजपने या निवडणुकीसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. सुरुवातीच्या कलानुसार केरळमध्ये भाजपची जादू चालली नाही हे आता स्पष्ट झालंय.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाच्या नियमांचे पालन करून मतमोजणी सुरु आहे.
गेल्या निवडणुकीत डाव्यांना 91 जागा मिळाल्या होत्या. त्यामध्ये सीपीएमला 58 तर सीपीआयला 19 जागा मिळाल्या होत्या. घटक पक्ष असलेल्या जेडीएस 3, एनसीपी 2, सीएस 1 आणि अपक्षांना 6 जागा मिळाल्या होत्या. 2016 मध्ये काँग्रेसला 47 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.