Kedarnath Dham : केदारनाथ मंदिरासमोर बॉयफ्रेंडला प्रपोज, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंदिर समिती अॅक्शन मोडमध्ये
Kedarnath Dham Viral Video : मंदिरासमोर प्रपोज केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केदारनाथ मंदिर समिती अॅक्शन मोडमध्ये आली आहे. श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.
Chardham Yatra 2023 : पवित्र चार धामांमधील सर्वात लोकप्रिय असलेलं केदारनाथ (Kedarnath) हिंदू धर्मियांचं श्रद्धास्थान आहे. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंदिर परिसरात व्हिडीओ आणि रिल्स बनवण्यावर बंदी (Ban) घातली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियामुळे केदारनाथ लोकांच्या मनांत भिनलं आहे. प्रत्येकाला आयुष्यात किमान एकदा केदारनाथला जाण्याची इच्छा नक्कीच असते. उत्तराखंडमधील केदारनाथ अनेक श्रद्धांळूंसाठी आस्थेचं स्थान आहे. पण, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी केदारनाथ व्ह्युज आणि लाईक्स मिळवण्याचं एक माध्यम बनलं आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने नवा आदेश जारी केला आहे.
कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ शूट करण्यावर बंदी
बद्रीनाथ-केदारनाथ धाममध्ये कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ शूट करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने एक आदेश जारी केला आहे, यानुसार मंदिर प्रशासनाकडून धाममध्ये यूट्यूब, इंस्टाग्राम रील्स किंवा इतर कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ शूट करण्यावर कारवाई करण्यात येईल. समिती आता केदारनाथ मंदिरात मोबाईल फोनवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. मोबाईल बंदी लागू झाल्यास येथे येणारे भाविक मंदिराच्या आत मोबाईल घेऊन जाऊ शकणार नाहीत किंवा व्हिडीओ बनवू शकणार नाहीत.
केदारनाथ मंदिरासमोर बॉयफ्रेंडला प्रपोज
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये प्रसिद्ध ब्लॉगर विशाखा केदारनाथ मंदिरासमोर बॉयफ्रेंडला प्रपोज करताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यावर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे. या व्हिडीओमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मंदिरासमोर प्रपोज केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केदारनाथ मंदिर समिती अॅक्शन मोडमध्ये आली आहे.
मंदिर समितीकडून आदेश जारी
मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी नवा आदेश जारी केला आहे. श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी रमेश चंद्र तिवारी यांनी म्हटलं आहे की, काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स युट्युब (YouTube), इंस्टाग्राम (Instagram) चा वापर करत धार्मिक भावनांच्या विरोधात श्री केदारनाथ मंदिर परिसरात युट्युब शॉट्स, व्हिडीओ आणि इंस्टाग्राम रील्स बनवत आहेत. यामुळे यात्रेकरुंसह देश-विदेशात राहणाऱ्या हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. यासंदर्भात भाविकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. श्री केदारनाथ मंदिर परिसरात धार्मिक भावनांच्या विरोधात युट्युब शॉर्टस, व्हिडीओ किंवा इन्स्टाग्राम रील्स बनवणाऱ्यांवर कडक नजर ठेवून आवश्यक कारवाई करण्यात येईल. ज्यामुळे भविष्यात असे प्रकार घडू नयेत, याची काळजी घेण्यात येईल.