शिवलिंगाची पूजा कराण्याची परवानगी देण्याची मागणी, काशी विश्वनाथ-ज्ञानवापी वाद प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Kashi Vishwanath temple Gyanvapi Masjid Case: काशी विश्वनाथ-ज्ञानवापी मशीद वादावर उद्या दुपारी दोन वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Kashi Vishwanath temple Gyanvapi Masjid Case: काशी विश्वनाथ-ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणी उद्या दुपारी दोन वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, सूर्यकांत आणि पीएस नरसिंहा यांच्या विशेष खंडपीठासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आले आहे. मुख्य प्रकरणासोबतच सर्वोच्च न्यायालय मशिदीच्या आवारात सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी मागणाऱ्या नव्या याचिकांवरही सुनावणी करणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात या संपूर्ण प्रकरणाची शेवटची सुनावणी 20 मे रोजी झाली होती. त्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी प्रकरण वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांकडे वर्ग केले होते. हा आदेश देताना न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने सांगितले की, या प्रकरणाची गुंतागुंत लक्षात घेऊन ते अधिक अनुभवी न्यायाधीशांकडे पाठवले जात आहे. जिल्हा न्यायाधीशांनी मुस्लिम बाजूच्या अर्जाला प्राधान्य द्यावे, असे खंडपीठाने म्हटले होते. ज्यामध्ये हिंदू पक्षकारांचे प्रकरण सुनावणीसाठी अयोग्य असल्याचे म्हटले होते.
सर्वोच्च न्यायालयाने ज्या आवारात शिवलिंग सापडले तिथे परिस्थिती यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. 17 मे रोजी दिलेला अंतरिम आदेश लागू राहील, असे न्यायालयाने म्हटले होते. या अंतर्गत शिवलिंगाची जागा सुरक्षित ठेवण्यात येणार आहे. म्हणजेच आवारात पूर्वीप्रमाणेच नमाज पठण सुरू राहणार आहे. न्यायालयाने प्रशासनाला वजू करण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यास सांगितले होते.
पूजेसाठी परवानगी मागणाऱ्या नवीन याचिका
ज्ञानवापी आवाराच्या न्यायालयीन सर्वेक्षणादरम्यान तेथे सापडलेले शिवलिंग आणि त्याजवळील तळघराची पूजा करण्याची परवानगी मागणाऱ्या 3 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. पहिली याचिका 7 महिलांची आहे. अमिता सचदेव, लक्ष्मी देवी, सीता साहू, मंजू व्यास, रेखा पाठक, प्रियांका गोस्वामी आणि पारुल खेडा अशी त्यांची नावे आहेत. अशीच एक याचिका राजेश मणी त्रिपाठी या याचिकाकर्त्यानेही दाखल केली आहे. तसेच काशी विश्वनाथ मंदिरात शेकडो वर्षांपासून पूजा करणाऱ्या व्यास कुटुंबातील शैलेंद्रकुमार पाठक व्यास यांनीही याचिका दाखल केली आहे. त्यांनी सांगितले की, मशिदीचा एक तळघर त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात होता. ठराविक अंतराने पूजा होते. वर्षातून दोनदा रामायण पठणही होते. 5 डिसेंबर 1992 नंतर त्यांना तिथे जाण्यापासून रोखण्यात आले.