Karnataka Covid Relief Package : कर्नाटक सरकारकडून 1250 कोटी रुपयांचं कोविड मदत पॅकेज जाहीर
कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे दररोज कमावून कुटुंब चालवणाऱ्या व्यक्तींना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यांना मदत व्हावी या उद्देशाने कर्नाटक सरकारने 1250 कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे.
बेळगाव : कर्नाटक सरकारने कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचे सपोर्ट पॅकेज जाहीर केले आहे. हे पॅकेज एकूण 1250 कोटी रुपयांचे असून त्यातून विविध उद्योग, व्यवसायातील व्यक्तींना मदत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आज ही मदत जाहीर केली. विधान सौध इथे मंत्री आणि अधिकारी यांची बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
कोरोना संक्रमण वाढत असल्याने अनेक उद्योग आणि व्यवसाय लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत दररोज कमावून कुटुंब चालवणाऱ्या व्यक्तींना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यांना मदत व्हावी या उद्देशाने कर्नाटक सरकारने 1250 कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. सरकार मदतीची ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे.
फूल उत्पादकांना प्रती हेक्टर दहा हजार रुपये देण्यात येणार असून याचा लाभ सुमारे 20 हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. फळे आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना एक हेक्टरला दहा हजार रुपये मदत देण्यात येणार असून याचा लाभ 69 हजार शेतकऱ्यांना होणार आहे. टॅक्सी आणि रिक्षा चालकांना तीन हजार रुपयांची मदत देण्यात येणार असून त्यामुळे 2.10 लाख रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मदत होणार आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना तीन हजार रुपये तर असंघटित कामगारांना दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत.
रस्त्यावर बसणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांना दोन हजार रुपये मिळणार आहेत. त्याचा लाभ 2.20 लाख जणांना होणार आहे. कलाकारांना आणि कला पथकातील व्यक्तींना तीन हजार रुपये मदत मिळणार असून त्याचा लाभ 16 हजार 095 व्यक्तींना होणार आहे.