(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Karnataka Assembly Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर, विद्यमान सहा आमदाराचं तिकीट कापलं
Karnataka Assembly Election : जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीमध्ये विद्यमान सहा आमदारांची तिकिटे कापण्यात आली आहे. विद्यमान आमदारांना तिकीट नाकारल्याने समर्थकांनी रास्ता रोको करून निदर्शने केली.
Karnataka Election BJP Candidate List: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Election) भाजपने 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यंदा भाजपने कर्नाटकात नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. बुधवारी जाहीर केलेल्या यादीत विद्यमान सहा आमदारांची तिकिटे कापली आहे. तर शेट्टार यांच्या जागेवर सस्पेंस कायम ठेवला आहे. भारतीय जनता पक्षात आलेले कॉंग्रेसचे नागराज छब्बी (Nagaraja Chabbi) यांना कलघाटगी येथून तिकिट देण्यात आले आहे. कोलार गोल्ड फील्ड (KGF)येथून आश्विनी सम्पंगी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 224 जागांपैकी भाजपने 212 जागांवर उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या जवळचे मानले जाणारे एनआर संतोष यांचे नाव जाहीर केलेल्या यादीत नाही. तसेच माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांच्या नावही यादीतन कापण्यात आले आहे. जगदीश शेट्टार हे हुबळी - धारवाडचे आमदार आहेत. पक्षाने त्यांना निवडणून न लढण्याचे आवाहन केले आहे. पक्षाच्या या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर शेट्टार यांना दिल्लीला बोलवण्यात आले. शेट्टार यांनी बुधवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट देखील घेतली.
जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर शेट्टार म्हणााले, माझा सहा विधानसभा निवडणूक जिंकण्याचा अनुभव पाहता नड्डा यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. पीटीआय या वृत्त संस्थेनुसार, यादी जाहीर केल्यानंतरचा घटनाक्रम पाहता भाजप लिंगायत समाजाचे दिग्गज नेते शेट्टार यांना उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. या अगोदर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी भाजपने वरिष्ठ नेत्यांची तिकिटे कापण्याचे ठरवले होते.
BJP releases the party's second list of 23 candidates for #KarnatakaElections2023
— ANI (@ANI) April 12, 2023
Nagaraja Chabbi, a Congress leader who recently joined BJP, to contest from Kalghatgi. pic.twitter.com/y5ugNGDaqu
विद्यमान आमदारांना तिकीट नाकारल्याने समर्थकांचा रास्ता रोको
बेळगाव उत्तरचे भाजपचे आमदार अनिल बेनके यांना आगामी निवडणुकीत तिकीट नाकारल्याने त्यांच्या समर्थकांनी रास्ता रोको करून निदर्शने केली. राणी कित्तूर चन्नमा चौकात मानवी साखळी करून एक तासाहून अधिक काळ वाहतूक रोखून धरली. भाजपने कर्नाटक विधानसभा निवडणुकीची दुसरी यादी बुधवारी रात्री जाहीर केली. या यादीत बेळगाव जिल्ह्यातील लक्ष्मण सवदी, बेळगाव उत्तरचे अनिल बेनके यांच्या ऐवजी दुसऱ्या उमेदवारांना संधी दिल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत .बेळगाव उत्तर मतदार संघात डॉ.रवी पाटील या लिंगायत समाजातील नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. अथणी येथून सवदी यांच्या ऐवजी महेश कुमठळी यांना संधी देण्यात आली आहे. अनिल बेनके विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांना नक्की तिकीट मिळेल अशी त्यांच्या समर्थकांना खात्री होती. पण बेनके यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे. बेनके यांनी स्वतंत्र म्हणून निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.