Kabir Jayanti 2022 : संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांच्या कार्याविषयी थोडक्यात...
Kabir Jayanti 2022 : कबीर दास हे भक्ती काळाचे एकमेव कवी आहेत ज्यांनी आपले संपूर्ण जीवन समाज सुधारणेच्या कार्यात व्यतीत केले. कबीर हे कर्मभिमुख कवी होते.
Kabir Jayanti 2022 : कबीर दास हे भक्ती काळाचे एकमेव कवी आहेत ज्यांनी आपले संपूर्ण जीवन समाज सुधारणेच्या कार्यात व्यतीत केले. कबीर हे कर्मभिमुख कवी होते. समाज आणि समाजाच्या कल्याणासाठी कबीर यांचे संपूर्ण जीवन उल्लेखनीय आहे. कबीर हे मार्मिक कवी असण्याबरोबरच उदारमतवादी समाजसुधारकही होते. एक प्रकारे, सार्थक धर्मनिरपेक्षतेची संकल्पना त्यांनी बजावली असं म्हणता येईल.
कबीर हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहेत. संत कबीर यांचा जन्म इ.स. 1149 साली झाला असे काहीजण मानतात तर, कुणी ते 1399 मध्ये जन्माला आले असे म्हणतात. महान संत कबीर म्हणजे काळाच्या पुढे असलेले कवी संत समाज सुधारक होते. धार्मिक थोतांडावर कडक आसूड ओढणारे आणि हजारो ग्रंथांचे पांडित्य खुले करणाऱ्या प्रेमाच्या अडीच अक्षराचा मंत्र सांगणारे पुरोगामी संत म्हणजे कबीर. त्यांनी तत्कालीन प्रचलित असणाऱ्या धर्मातील अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथा यावर दोह्याच्या माध्यमातून टीका केली. त्यांच्या लिखाणामुळे तत्कालीन अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धा पसरवणारे भोंदू बाबा आणि बुवा सनातनी यांचे धाबे दणाणले होते. संत कबीर यांनी लिहिलेले बहुतांश दोहे यावर विज्ञानवादी बुद्ध धम्माचा प्रभाव दिसतो. संत कबीर हे सत्य, विज्ञान आणि कर्मसिद्धान्त यांवर लिहीत. त्यांचा लिखाणामुळे संत कबीर संपूर्ण जगाममध्ये प्रसिद्ध झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संत कबीर यांना गुरू मानले. एवढ्या शतकानंतरही महान संत कबीर यांनी लिहिलेले दोहे आजही समर्पक वाटतात.
जातपात, कुलाभिमान, धर्मभेद, रूढी, व्रतवैकल्ये, कर्मकांड इत्यादींवर त्यांचा काडीमात्र विश्वास नव्हता. हिंदू अगर इस्लामी धर्ममार्तंडांच्या दोषांवर,विसंगतींवर आणि चारित्र्यहीनतेवर त्यांनी कडाडून हल्ले केले आहेत. त्यांच्या काव्यातील दृष्टांतांतून, प्रतीकांतून, युक्तिवादांतून आणि प्रामाणिक अनुभूतींतून त्यांच्या असामान्य प्रतिभेची साक्ष पटते. तत्कालीन समाजाबाबतचे त्यांचे निरीक्षण सूक्ष्म असून, त्यांच्या निर्भय, साहसी आणि कलंदर व्यक्तिमत्त्वाचे विलोभनीय दर्शन त्यांच्या काव्यरचनेतून घडते. कबीर यांनी तत्कालीन धार्मिक मतभेदांची तीव्रता कमी करून वैष्णव आचार्यांचा भक्तिमार्ग सामान्य जनतेपर्यंत आणून पोहोचविला. बाह्य कर्मकांडात रुतून बसलेली धर्माची मूळ मानवतावादी तत्त्वे शोधण्याचा आणि त्यांचा पुरस्कार करण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. अद्वैती, सूफी, योगमार्गी,भक्तिमार्गी या सर्वांनाच आपलासा वाटावा, असा भक्तिमार्ग रूढ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अनेक हिंदू-मुस्लीम कबीर पंथाचे ते अनुयायी झाले.
महत्वाच्या बातम्या :