Justice Shekhar Kumar Yadav : देश बहुसंख्यांकांच्या इच्छेनुसार चालेल, हायकोर्टाचे न्या. शेखर कुमार यादव यांचे वक्तव्य; सुप्रीम कोर्टाकडून दखल
Justice Shekhar Kumar Yadav : विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी धार्मिक वक्तव्य केलं. त्या वक्तव्याची दखल आता सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे.
नवी दिल्ली: बहुसंख्याकांच्या इच्छेनुसार हा देश चालेल असं म्हणणाऱ्या न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या वक्तव्याची दखल आता सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडून यासंदर्भातील तपशील मागवले आहेत. न्या.शेखर कुमार यादव हे अलाहाबाद उच्च न्यायालयानेच न्यायाधीश आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.
अलाहाबादमध्ये विश्व हिंदू परिषदेकडून समान नागरी कायद्यावर व्याख्यान ठेवण्यात आलं होतं. त्यामध्ये बोलताना न्यायमूर्ती शेखर कुमार म्हणाले होते की, इथं फक्त बहुसंख्याकांचं हित आणि सुखाची काळजी घेतली जाईल. बहुसंख्याखांच्या इच्छेनुसार हा देश चालेल. जर आपण कुटुंब किंवा समाजाच्या संदर्भात पाहिले तर बहुसंख्य लोकांच्या कल्याणासाठी आणि आनंदासाठी तेच स्वीकारले जाईल.
या कार्यक्रमात बोलताना न्या. शेखर कुमार यादवांकडून अल्पसंख्याक समाजाच्या विरुद्ध अनादरयुक्त शब्दांचा वापर करण्यात आला. यासंबंधी वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याची दखल घेतली.
काय म्हणाले होते न्या. शेखर कुमार यादव?
यावेळी बोलताना न्यायमूर्ती शेखर यादव यांनी मुस्लिम समुदायाचे नाव न घेता म्हटलं होतं की, बहुपत्नीत्व, तिहेरी तलाक आणि हलाला यासारख्या प्रथा अस्वीकार्य आहेत. त्याला पर्सनल लॉ परवानगी देतो असं म्हटल्यास ते मान्य होणार नाही. आमच्या धर्मग्रंथ आणि वेदांमध्ये देवी म्हणून मान्यता मिळालेल्या महिलेचा तुम्ही अपमान करू शकत नाही. तुम्ही चार बायका ठेवण्याचा, हलाला किंवा तिहेरी तलाकचा हक्क सांगू शकत नाही. तुम्ही म्हणता की आम्हाला तिहेरी तलाक देण्याचा अधिकार आहे आणि महिलांना पोटगी देणार नाही. पण हा अधिकार चालणार नाही.
सरन्यायाधीशांकडे तक्रार दाखल
या प्रकरणी कॅम्पेन फॉर ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी अँड रिफॉर्म्स (CJAR) ने सरन्यायाधीशांना पत्र लिहून त्यांच्या वक्तव्याची तक्रार केली आहे. सीजेएआरने पाठवलेल्या पत्रात न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या वक्तव्याची अंतर्गत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत न्यायमूर्ती यादव यांना सर्व न्यायालयीन कामकाजापासून दूर ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच न्यायमूर्ती असतानाही त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात भाग घेतल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीशांनी या पत्राची दखल घेतली आहे.
शेखर कुमार यादव यांनी 12 डिसेंबर 2019 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. 26 मार्च 2021 रोजी त्यांची स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती यादव 8 डिसेंबर रोजी विश्व हिंदू परिषदेच्या काशी प्रदेशाच्या अधिवेशनात सहभागी झाले होते. हायकोर्ट बारच्या वाचनालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले.
ही बातमी वाचा: