(Source: ECI/ABP News/ABP Majha)
न्या. रंजन गोगोई भारताचे 46वे सरन्यायाधीश
गोगोई भारताचे 46वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. ईशान्य भारतातून नियुक्त झालेले न्यायमूर्ती गोगोई पहिले सरन्यायाधीश आहेत.
नवी दिल्ली : न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची आज शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोगोई यांना सरन्यायधीशपदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवन येथे या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. गोगोई भारताचे 46वे सरन्यायाधीश ठरले आहेत, तर ईशान्य भारतातून नियुक्त झालेले पहिले सरन्यायाधीश आहेत.
सरन्यायाधीय दीपक मिश्रा यांचा कार्यकाळ काल (2 ऑक्टोबर) समाप्त झाला. न्या. रंजन गोगोई यांचा कार्यकाळ 17 नोव्हेंबर 2019 पर्यंत म्हणजे 13 महिने असणार आहे.
माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सरन्यायाधीश पदासाठी रंजन गोगोई यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारच्या विधी मंत्रालयाकडे केली होती. ज्येष्ठ न्यायमूर्तींना सरन्यायाधीशपदी नियुक्त करण्याची परंपरा आहे. मात्र औपचारीकरित्या नाव पाठवण्याचा अधिकार सरन्यायाधीशांना असतो. त्यामुळे विद्यमान सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी ही पंरपरा कायम ठेवली होती.
न्यायमूर्ती रंजन गोगोई फेब्रुवारी 2001मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतले होते. फेब्रुवारी 2011मध्ये त्यांची पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. त्यानंतर एप्रिल 2012 पासून ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत.
गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात सरन्यायाधीशांविरोधात बंड पुकारणाऱ्या चार न्यायमूर्तींमध्ये गोगोई यांचाही समावेश होता. या घटनेनंतर त्यांचं नाव सरन्यायाधीश पदासाठी पाठवलं जाणार की नाही याबाबत चर्चा रंगली होती. लवकरच सरकारच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींकडून सरन्यायाधीशांच्या नावाची घोषणा केली जाईल.