(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Osaka Gas : भारतीय शहरी पाईप गॅस वितरणात जपानच्या ओसाका कंपनीची एन्ट्री
Osaka Gas : भारतात स्वच्छ इंधनाचे धोरण राबवण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून 2030 पर्यंत देशात 15 टक्के स्वच्छ इंधनाच्या वापराचे ध्येय ठेवण्यात आलं आहे.
टोक्यो : जपानच्या ओसाका गॅस एजन्सी आता भारतीय गॅस वितरण बाजारामध्ये उतरली आहे. ओसाका गॅस एजन्सीने सिंगापूरस्थित असलेल्या एजीपी इंटरनॅशनल होल्डिंग्ज (AG&P) मध्ये गुंतवणूक केली असून ही कंपनी जगभरातील गॅस वितरण व्यवस्थेमध्ये कार्यरत आहे. भारतात येत्या काळात पीएनजी म्हणजे Piped Natural Gas च्या वितरणासाठी मोठं मार्केट उपलब्ध होणार असल्याने ही कंपनी आता भारतीय मार्केटमध्ये स्पर्धा करण्यास उतरल्याचं स्पष्ट आहे.
भारतात स्वच्छ इंधनाचे धोरण राबवण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून 2030 पर्यंत देशात 15 टक्के स्वच्छ इंधनाच्या वापराचे ध्येय ठेवण्यात आलं आहे. सध्या हे प्रमाण केवळ 6 टक्के इतकं आहे. वातावरणातील बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी भारताने हे पाऊल उचललं आहे.
ओसाका गॅस एजन्सी ही जपानमधील शहरी गॅस सप्लायर क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. सिंगापूरस्थित असलेल्या एजीपी इंटरनॅशनल होल्डिंग्ज (AG&P) ही भारतात गॅस सप्लायच्या क्षेत्रात कार्यरत आहे. आता याच कंपनीमध्ये ओसाका कंपनीकडून तब्बल 120 दशलक्ष डॉलर्स इतकी मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे.
एजीपी इंटरनॅशनल होल्डिंग्ज (AG&P) या कंपनीकडे भारतातील 12 प्रदेशातील गॅस वितरणासाठीचे आठ वर्षांसाठी अधिकार आहेत. तसेच या प्रदेशातील इन्फ्रास्ट्रक्चर लायसन्सचे 25 वर्षांसाठीचे अधिकार आहेत. येत्या काही काळात भारतामध्ये पीएनजीचे मोठे जाळे विकसित होणार असून भारत ही आशियातील सर्वात महत्वाची बाजारपेठ असेल असं ओसाका गॅस एजन्सीने आपल्या निवेदनात म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या :