Pulwama Encounter: पुलवामामध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार
Encounter In Jammu-Kashmir: रविवार मध्यरात्री झालेल्या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याला ठार करण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे.
भारत : जम्मू-काश्मीरमधील (Jammu & Kashmir) पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील लैरो-परिगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorist) चकमक झाली आहे. या चकमकीत भारतीय लष्कराकडून एका दहशवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या मोहिमेत जम्मू आणि काश्मीरचे पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणेचा सहभाग होता.
काश्मीरमधील जोन पोलिसांनी रविवारी रात्री चकमक सुरु असल्याची माहिती दिली होती. जोन पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, पुलावामामधील लैरो-परिगाम या भागामध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक झाली आहे. तसेच यामुळे पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणा कामाला लागली आहे.
शोध मोहीम सुरु
काही भागांमध्ये दहशतवाद्यांचे तळ असण्याची गुप्त माहिती केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर या भागांमध्ये शोध मोहिम सुरु करण्यात आली होती. या दरम्यान केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. तसेच आता सुरक्षा यंत्रेणेने दहशवाद्यांच्या तळावर चोहीकडून गोळाबार सुरु केला आहे. परंतु आतमध्ये अजून किती दहशतवादी लपून बसले आहे याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच या मोहिमेसाठी सैन्याच्या किती जवानांची फौज पाठवण्यात आली आहे याविषयी देखील कोणतीच माहिती देण्यात आली नाही.
दरम्यान जम्मू आणि काश्मीरमधील भागांमध्ये सातत्याने दहशतावादी हल्ले करण्यात येतात. परंतु त्या हल्ल्यांना भारतीय लष्कराकडून चोख उत्तर देण्यात येतं. यावेळी देखील भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्यात आलं आहे. त्यामुळे या मोहिमेमध्ये आणखी किती दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
VIDEO | An encounter that broke out between security forces and militants in Larrow-Parigam area of Pulwama district in Jammu and Kashmir last night, continued on Monday morning. pic.twitter.com/h29f2c7N3Z
— Press Trust of India (@PTI_News) August 21, 2023
राजौरीमध्ये झाली होती चकमक
दोन आठवड्यांपूर्वी जम्मू - काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत देखील एका दहशवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले होते. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यामध्ये केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि काश्मीर पोलिसांनी ही मोहीम राबवली होती. पण याआधी कुलगाम जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये तीन भारतीय जवान शहीद झाले होते. तसेच पुंछमध्ये देखील दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यांचा तो प्रयत्न सुरक्षा यंत्रणांनी हाणून पाडला होता आणि त्यांच्या मोहरक्याला ठार मारले होते.