Pulwama Attack : सहकारी चालकाच्या जागी आले होते चालक जयमल सिंह, पुलवामा हल्ल्यावरील पुस्तकातून उलगडा
Pulwama Attack : 2019 ला पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफच्या गाडीचे चालक जयमल सिंह शहीद झाले होते. हल्ला झालेल्या दिवशी जयमल सिंह चालक म्हणून येणार नव्हते. परंतु, त्या दिवशी ते त्यांच्या सहकाऱ्याच्या ठिकाणी बदली चालक म्हणून आले होते.
Pulwama Attack : 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यात सीआरपीएफच्या गाडीचे चालक असलेले जयमल सिंह हे देखील शहीद झाले होते. या हल्ल्यासंदर्भात आता एक माहिती समोर आली आहे. हल्ला झालेल्या दिवशी जयमल सिंह चालक म्हणून येणार नव्हते. परंतु, त्या दिवशी ते त्यांच्या सहकाऱ्याच्या ठिकाणी बदली चालक म्हणून आले होते. पुलवामा हल्ल्यावर नुकतेच एक पुस्तक प्रकाशित झाले आहे, त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आयपीएस दानेश राणा यांनी "अॅज फार अॅज द सेफ्रॉन फिल्ड्स" हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी पुलवामा हल्ल्याच्या सर्व घडोमोडींचा घटनाक्रम स्पष्ट केला आहे. राणा यांनी काही मुलाखती, पुलवामा हल्ल्यासंदर्भादत दाखल झालेले पोलीस चार्जशीट आणि इतर पुराव्यांच्या आधारे हे पुस्तक लिहिले आहे.
पुलवामा हल्ला झाला त्या दिवशी हेड कॉन्स्टेबल जयमल सिंग हे आपल्या इतर चालक सहकाऱ्यांसह सर्वात शेवटी रिपोर्टिंगसाठी पोहोचले. चालक हे नेहमी शेवटी रिपोर्टिंग करत असतात. कारण गाडी चालवावी लागत असल्याने त्यांना झोपण्यासाठी अर्धा तास जास्तीचा वेळ दिला जातो. जयमल सिंग त्या दिवशी गाडी चालवणार नव्हते. परंतु, ते दुसऱ्या सहकाऱ्याच्या जागी आले होते.
राणा यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, हिमाचल प्रदेशमधील चंबा येथील राहणारे हेड कॉन्स्टेबल कृपाल सिंह यांनी आपल्या मुलीचे लग्न असल्यामुळे सुट्टीसाठी अर्ज केला होता. कृपाल यांना आधीच नोंदणी क्रमांक HR49F-0637 असलेली बस देण्यात आली होती आणि जम्मूला परतल्यानंतर रजेवर जाण्यास सांगितले होते. कृपाल सिंह यांच्यानंतर बस घेण्याची जबाबदारी जयमल सिंग यांच्यावर होती. ते एक अनुभवी चालक होते. त्यांनी हल्ला झालेल्या हायवे 44 वर अनेक वेळा गाडी चालवली होती. या महामार्गावरील उतार आणि वळणांबाबत त्यांना चांगली माहिती होती. 13 फेब्रुवारीच्या रात्री उशिरा त्यांनी पत्नीला पंजाबमध्ये फोन करून शेवटच्या क्षणी ड्युटी बदलल्याबद्दल सांगितले. ते त्यांचे शेवटचे संभाषण होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना वीरमरण आलं.
पुलवामा येथे शहीद झालेल्या 40 जवानांच्या बसमध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील कॉन्स्टेबल ठका बेलकर यांचाही समावेश होता. हल्ल्याच्या आधीच काही दिवस त्यांचे लग्न ठरले होते. कुटंबातील मंडळी त्यांच्या लग्नाची तयारी करत होते. बेलकर यांनी रजेसाठी अर्ज केला होता. परंतु, त्यांची रजा मंजूर झाली नव्हती. त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांसोबत तेही या बसमधून निघाले होते. परंतु, बस सुटण्याआधी काही वेळ त्यांना मोबाईलवर रजा मंजूर झाल्याचा मेसेज आला आणि ते बसमधून खाली उतरले. त्यानंतर काही वेळातच या बसवर हल्ला झाला. परंतु, काही वेळापूर्वी आलेल्या मेसेजमुळे बेलकर यांचे प्राण वाचले.
महत्वाच्या बातम्या
Pulwama Attack : पुलवामा हल्ल्यात वापरलेल्या अमोनियम नायट्रेटची 'अॅमेझॉन'कडून डिलिव्हरी?
सलाम! पुलवामा हल्ल्यातील शहीद मेजर धौंडियाल यांची वीरपत्नी भारतीय सैन्यदलाच्या सेवेत रुजू