International Flight : आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार
कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याचे दिसत असल्याचे केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर महिन्यात आलेल्या आदेशानुसार ही सेवा (International Flight Services) 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगितलं होतं.
नवी दिल्ली : कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याचे दिसत असल्याचे केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय विमासेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर महिन्यात ही सेवा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र वाढता कोरोना प्रसार पाहता पुन्हा ही सेवा सुरु करण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे. DGCA ने जारी केलेल्या परिपत्रकात याबाबत आदेश दिले आहेत. कोरोना महामारीमुळं देशात 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर बंधनं आणली आहेत. 16 जुलै रोजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत विमान वाहतुकीला परवानगी दिली होती. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कधी सुरु होणार याकडं मात्र लक्ष लागून आहे.
एअर बबल करार
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसाठी भारताने काही देशांशी हवाई करार केले आहेत. त्याला एअर ब्रीज किंवा एअर बबल असं म्हटलं जातं. केनिया, भूतान, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, युएई, कतार, नायजेरिया, मालदीव, जपान, इराक, जर्मनी इत्यादी अनेक देशांसह भारताने एअर बबल करार केले आहेत. दोन देशांमधील हवाई बबल करारानुसार विशेष आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे प्रतिबंधात्मक परिस्थितीत त्यांच्या एअरलाइन्सद्वारे एकमेकांच्या प्रदेशात ऑपरेट करता येऊ शकते.
एअर बबल म्हणजे काय? जेव्हा विशिष्ट आंतरराष्ट्रीय परिस्थितीत सर्वच देशांना जगातल्या सर्व देशांबरोबर आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक करता येत नाही, तेव्हा व्यापारी किंवा मैत्रीपूर्ण संबंध असलेले दोन देश एकत्र येऊन द्वीपक्षीय करार करतात, त्यानुसार करार करणाऱ्या दोन देशांमध्ये निश्चित केलेल्या तरतुदीनुसार हवाई वाहतूक करता येते. तसंच या दोन देशांदरम्यान विमान वाहतूक करताना, ज्या ज्या देशांच्या हवाई हद्दी वापरायच्या असतात, त्यांचीही सहमती घ्यावी लागते.
जगातल्या 218 देशांतील कोरोना बाधितांची एकूण संख्या सहा कोटींवर
जगातल्या 218 देशांतील कोरोना बाधितांची एकूण संख्या सहा कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात कोरोना बाधितांच्या संख्येत 6 लाखांची वाढ झालीय. तसेच 12 हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. त्या आधी एका दिवसात 11,733 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत जगात सर्वाधिक मृत्यू हे अमेरिकेत झाले आहेत. त्यानंतर मेक्सिको, इटली, पोलंड, ब्राझील, भारत, रशिया, इराण या देशांचा क्रमांक लागतोय.
एकूण 14 लाख लोकांचा मृत्यू वर्ल्डोमीटर वेबसाइटच्या माहितीनुसार, जगात आतापर्यंत 6.07 कोटी कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. तसेच कोरोनामुळे एकूण 14 लाख 25 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत एकूण 4 कोटी 19 लाख रुग्ण बरे झाले आहेत. अजूनही उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 1 कोटी 73 लाख इतकी आहे.
कोरोना बाधित टॉप 10 देश कोरोनाच्या प्रभावाच्या यादीत सर्वात वरचा क्रमांक अमेरिकेचा लागतो. अमेरिकेत अजूनही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. गेल्या 24 तासात अमेरिकेत 1 लाख 78 हजार नव्या कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 92 लाख इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात भारतात 44 हजार नव्या कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. तर कोरोनाच्या संख्येबाबत ब्राझीलचा जगात तिसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये गेल्या 24 तासात 45 हजार नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.