एअर बबलच्या माध्यमातून परवापासून आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सुरु करणार
भारताने युरोप आणि अमेरिकेशी द्वीपक्षीय हवाई करार केले आहेत. त्यानुसार फ्रान्स आणि अमेरिका या दोन देशांसाठी विमान वाहतूक सुरु होऊ शकते. त्याला एअर ब्रीज किंवा एअर बबल असं म्हटलं जातं.
नवी दिल्ली : केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत विमान वाहतुकीला परवानगी दिल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकही लवकरच सुरु केली जाणार आहे. मात्र ही व्यवस्था बायलॅटरल बबल म्हणजेच दोन देशांमधील विशेष द्वीपक्षीय कराराचा भाग असणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ही माहिती दिली.
भारताने युरोप आणि अमेरिकेशी द्वीपक्षीय हवाई करार केले आहेत. त्यानुसार फ्रान्स आणि अमेरिका या दोन देशांसाठी विमान वाहतूक सुरु होऊ शकते. त्याला एअर ब्रीज किंवा एअर बबल असं म्हटलं जातं.
एअर बबल म्हणजे काय?
जेव्हा विशिष्ट आंतरराष्ट्रीय परिस्थितीत सर्वच देशांना जगातल्या सर्व देशांबरोबर आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक करता येत नाही, तेव्हा व्यापारी किंवा मैत्रीपूर्ण संबंध असलेले दोन देश एकत्र येऊन द्वीपक्षीय करार करतात, त्यानुसार करार करणाऱ्या दोन देशांमध्ये निश्तित केलेल्या तरतुदीनुसार हवाई वाहतूक करता येते. तसंच या दोन देशांदरम्यान विमान वाहतूक करताना, ज्या ज्या देशांच्या हवाई हद्दी वापरायच्या असतात, त्यांचीही सहमती घ्यावी लागते.
आजच्या पत्रकार परिषदेत हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी सांगितलं की, फ्रान्सला पॅरीस ते मुंबई, दिल्ली आणि बंगळुरु या तीन शहरांदरम्यान हवाई वाहतूक सुरु करण्याची इच्छा आहे. ही विमानसेवा 18 जुलै म्हणजे परवा दिवशीपासून सुरु होईल आणि 1 ऑगस्टपर्यंत कार्यरत राहिल. कारण एअर बबल नुसार निश्चित कालावधीतच ठरलेल्या विमानसेवा पूर्ण करायच्या असतात. 18 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान भारतातील तीन शहरे ते पॅरिस दरम्यान 28 विमान फेऱ्या नियोजित करण्यात आल्या आहेत.
तसंच अमेरिका आणि भारत यांच्यात 17 ते 31 जुलै दरम्यान 18 विमानसेवाांची उड्डाणे निश्चित करण्यात आली आहेत. ही उड्डाणे दिल्ली ते न्यूयॉर्क आणि दिल्ली ते सॅनफ्रॅन्सिस्को दरम्यान होतील.
युनायडेट किंगडम आणि भारत यांच्या दरम्यान एअर बबल प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहितीही केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांनी दिली. जर्मनी कडूनही भारताला एअर बबलसाठी विनंती आल्याचं हरदीपसिंह पुरी यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरस लॉकडाऊन लागू केल्यापासून म्हणजे 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद आहे. या लॉकडाऊनला जशीजशी मुदतवाढ मिळत गेली तसतशी हवाई वाहतूक संचालनालयाने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवरील बंदी वाढवत नेली, यापूर्वी 3 जुलै रोजी वाढवलेली बंदी 15 जुलैपर्यंत म्हणजे आज मध्यरात्रीपर्यंत असणार आहे. त्यानंतर म्हणजे उद्यापासून आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सुरु होऊ शकेल.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात जगभरातील विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सरकारने 1103 विमान उड्डाणे केली. या वंदे भारत मोहीमेतून दोन लाखांपेक्षा जास्त भारतीयांना मायदेशी आणण्यात आलं आहे.