एक्स्प्लोर
टीव्ही अँकरच्या अपमानास्पद प्रश्नामुळे सर्जिकल स्ट्राईक : पर्रिकर
पणजी : केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांना एका टीव्ही अँकरने विचारलेल्या अपमानास्पद प्रश्नामुळे सर्जिकल स्ट्राईक घडला, असा खळबळजनक दावा माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केला आहे. 2015 मध्ये म्यानमारच्या सीमेवर बंडखोरांविरोधात झालेल्या कारवाईनंतर 'तो' प्रश्न विचारण्यात आला होता.
पाकव्याप्त काश्मिरमध्ये भारतीय सैन्याने केलेलं सर्जिकल स्ट्राईक हे 15 महिने आधीच नियोजित होतं, असं गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी असलेले तत्कालीन संरक्षणमंत्री पर्रिकर म्हणाले. गोव्यात उद्योजकांच्या मेळाव्यापूर्वी त्यांनी हा गौप्यस्फोट केला.
4 जून 2015 रोजी ईशान्येकडील दहशतवादी गटाने मणीपूरच्या चंदेल जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या ताफ्यावर हल्ला चढवला होता. यामध्ये 18 जवान शहीद झाले होते.
'या घटनेविषयी माहिती मिळाली, तेव्हा अत्यंत अपमानास्पद वाटलं. केवळ दोनशे दहशतवाद्यांच्या एका छोट्याशा संघटनेने 18 जवानांचे प्राण घेणं हा भारतीय लष्कराचा अवमान होता. आम्ही दुपार-संध्याकाळ चर्चेला बसलो. 8 जून रोजी केलेल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये 70 ते 80 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.' असं पर्रिकर म्हणाले.
सर्जिकल स्ट्राईकसाठी एकाही हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला नव्हता. हेलिकॉप्टर्स स्टाण्डबायला होती.
आणीबाणीची परिस्थिती उद्भवली असती, तरच हेलिकॉप्टरचा वापर केला असता, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
त्यावेळी मीडियाने विचारलेला एक प्रश्न मात्र जिव्हारी लागला, असं मनोहर पर्रिकर म्हणाले. केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड हे टीव्हीवर वेगवेगळ्या सर्च ऑपरेशन्सविषयी माहिती देत होते. त्यावेळी अँकरने त्यांना विचारलं की 'पश्चिम भागात हे ऑपरेशन करण्याची तुमची हिंमत आणि क्षमता आहे का?'
मी हा प्रश्न लक्षपूर्वक ऐकला, पण योग्य वेळ येईल तेव्हाच याला उत्तर देण्याचं ठरवलं होतं. 29 सप्टेंबर 2016 रोजी पश्चिम भागात झालेल्या सर्जिकल स्ट्राईकचं नियोजन 9 जून 2015 रोजी म्हणजे 15 महिने आधीच झालं होतं, असं पर्रिकर यांनी स्पष्ट केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement