विमानसेवा विस्कळीत! इंडिगोच्या मदतीला धावली भारतीय रेल्वे, देशभरात अनेक ठिकाणी चालवल्या स्पेशल ट्रेन
इंडिगोची विमानसेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अशातच इंडिगोच्या मदतीला भारतीय रेल्वे धावली आहे. भारतीय रेल्वेने देशभरात अनेक स्पेशल ट्रेन चालवल्या आहेत.
Indigo Airlines : गेल्या काही दिवसांत इंडिगो एअरलाइन्सच्या (IndiGo Airlines) नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर कंपनीने काल मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द केली होती. याचा मोठा फटका प्रवाशांना बसला होता. या विरोधात प्रवाशांनी संताप देखील व्यक्त केला होता. दरम्यान, इंडिगोची विमानसेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अशातच इंडिगोच्या मदतीला भारतीय रेल्वे धावली आहे. भारतीय रेल्वेने देशभरात अनेक स्पेशल ट्रेन चालवल्या आहेत. रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील नीला यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
भारतीय रेल्वेने देशभरात अनेक स्पेशल ट्रेन चालवल्या
इंडिगो एअरलाइन्समुळे विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना झालेली अडचण लक्षात घेऊन भारतीय रेल्वे त्यांच्या मदतीला धावून आली आहे. भारतीय रेल्वेने देशभरात अनेक स्पेशल ट्रेन चालवल्या गेल्या तसेच येणाऱ्या काही दिवसात आणखीन स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत. काही ट्रेन्सला अधिकचे डबे जोडण्यात आले आहेत. मध्य रेल्वेने 6 तारखेला 7 एक्सप्रेस, 7 तारखेला 11 आणि आज 4 स्पेशल एक्सप्रेस चालवल्या आहेत. यामध्ये एकूण मिळून 81 टक्के आरक्षण झाले. म्हणजेच एकूण 20 हजार तिकिटांपैकी 17 हजार तिकिटे विकली गेली. विमानसेवा बाधित झाल्याने प्रवाशांनी या स्पेशल ट्रेन्सचा आधार घेतला.
इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्यानं इतर विमान कंपन्यांच्या तिकीट दरात वाढ
इंडिगो एअरलाईन्सच्या (Indigo Airlines) बिघडलेल्या वेळापत्रकाचा देशातील हवाई प्रवासावर गंभीर परिणाम होत असून, इतर विमान कंपन्यांनी तिकीट दरात (Ticket Price) मोठी वाढ केली आहे. अनेक लोकप्रिय मार्गावरील भाडे प्रचंड वाढले असून, एअर इंडियाच्या पुणे–मुंबई उड्डाणाचे तिकीट दर तब्बल एक लाख रुपयांवर पोहोचले आहेत. तसेच नागपूर–मुंबई मार्गावरील विमानासाठी देखील 30 हजार रुपयांहून अधिक भाडे आकारले जात असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंडिगोचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून पुणे विमानतळावर त्याची सर्वाधिक झळ बसली आहे. शुक्रवारी इंडिगोची 46 उड्डाणे रद्द करण्यात आली होती. यात दिल्ली, नागपूर, चेन्नई, कोची, बंगळुरू, रांची तसेच महाराष्ट्रातील 23 उड्डाणांचा समावेश आहे. बाहेरील राज्यांतून पुण्यात येणारी 23 उड्डाणे देखील रद्द करण्यात आली होती. काही उड्डाणांचे वेळापत्रक दिवसभरात अनेकदा बदलण्यात आले, त्यामुळे प्रवासी पूर्णपणे गोंधळून गेल्याचे पाहायला मिळाले. इंडिगोने शुक्रवारी देशभरातील जवळपास 500 उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर सलग चौथ्या दिवशी देशातील विमानतळांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दिल्ली विमानतळावरून 5 डिसेंबर 2025 रोजी उड्डाण करणारी सर्व देशांतर्गत विमाने मध्यरात्रीपर्यंत (11:59 वाजेपर्यंत) रद्द केल्याचे दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने 'एक्स'वर जाहीर केले. यामुळे हजारो प्रवासी ताटकळले, काहींना रात्रभर विमानतळावरच थांबावे लागले.
























