(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सरन्यायाधीशांच्या जन्मापूर्वीच खटला दाखल, पण अखेर निकाली निघाला! तब्बल 72 वर्षांपूर्वीचं प्रकरण आहे तरी काय?
Berhampur Bank Liquidation Case: 72 वर्ष जुना खटला निकाली निघाला. पाच जुन्या प्रलंबित प्रकरणांपैकी तीन प्रकरणं अद्यापही प्रलंबितच...
Berhampur Bank Liquidation Case: 72 वर्षांतील भारतातील सर्वात जुना खटला कोलकाता उच्च न्यायालयाच्या (Culcutta High Court) सर्वात जुन्या खंडपीठानं अखेर निकाली काढला. गेल्या आठवड्यात या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयानं आपला निकाल सुनावला. महत्त्वाची बाब म्हणजे, विद्यमान सरन्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव (Prakash Srivastava) यांच्या जन्माच्या दशकभरापूर्वी बेरहामपूर बँकेशी (Berhampur Bank) संबंधित हा खटला दाखल झाला होता. दरम्यान, बेरहामपूर बँक ((Berhampur Bank News) लिमिटेडच्या लिक्विडेशन प्रक्रियेशी संबंधित खटला अखेर निकाली निघाला आहे.
हे प्रकरण हाताळल्यानंतर, आता पाच सर्वात जुन्या प्रलंबित प्रकरणांपैकी तीन प्रकरणं अद्याप निकाली निघालेली नाहीत. उर्वरित तीन प्रकरणांपैकी दोन दिवाणी प्रकरणं बंगालमधील मालदा (Malda News) येथील दिवाणी न्यायालयात, तर एक मद्रास उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणांचं निराकरण करण्यासाठी मालदा कोर्टानं मार्च आणि नोव्हेंबरमध्ये शेवटची सुनावणी घेतली होती.
प्रकरण नेमकं काय?
बेरहामपूर खटला हा भारतीय न्यायालयात सुनावणी होणारा सर्वात जुना खटला आहे. 19 नोव्हेंबर 1948 रोजी कोलकाता उच्च न्यायालयानं तत्कालीन दिवाळखोरीत निघालेल्या बेरहामपूर बँक बंद करण्याचा आदेश दिला होता. या प्रकरणातील लिक्विडेशन कार्यवाहीला आव्हान देणारी याचिका 1 जानेवारी 1951 रोजी दाखल करण्यात आली होती. आणि त्याच दिवशी कोर्टाच्या कामकाजात केस क्रमांक 71/1951 म्हणून नोंद करण्यात आली होती.
आतापर्यंत 'या' प्रकरणात काय-काय झालं?
कर्जदारांकडून पैसे वसूल करण्यासाठी बेरहामपूर बँकेवर अनेक खटले होते. यापैकी अनेक कर्जदारांनी बँकेच्या दाव्याला आव्हान देत न्यायालयात धाव घेतली होती. बँकेच्या लिक्विडेशनला आव्हान देणारी याचिका गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हायकोर्टात दोनदा सुनावणीसाठी आली होती, पण त्या याचिकेवर एकही सुनावणी झाली नाही.
17 वर्षांपूर्वीच निघालेला तोडगा, पण...
न्यायमूर्ती कपूर यांनी न्यायालयाच्या लिक्विडेटरकडून अहवाल मागवला होता. 19 सप्टेंबर 2022 रोजी सहाय्यक लिक्विडेटरनं खंडपीठाला सांगितलं की, प्रकरण ऑगस्ट 2006 मध्ये निकाली काढण्यात आलं. याचा नोंदीमध्ये समावेश नसल्यानं प्रकरण प्रलंबित यादीतच राहिल्याची माहिती मिळाली.
न्यायमूर्ती कपूर यांनी 23 ऑगस्ट 2022 रोजी दुसऱ्या सर्वात जुन्या खटल्यांबाबत शेवटची सुनावणी केली. यावेळी त्यांनी एक वकील आणि एका विशेष अधिकाऱ्याला सर्व पक्षकारांना भेटून प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्याचं मार्ग सुचवण्याचे निर्देश दिले.