(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Independence Day 2023 : स्वातंत्र्यलढ्यातील रसायनशास्त्राची विद्यार्थिनी, जिने क्रांतीकारकांना स्फोटकं बनवण्याचं प्रशिक्षण दिलं; वाचा क्रांतिकारी कल्पना दत्ताबाबत...
Freedom Fighter Kalpana Datta : मानिनी चॅटर्जी यांनी लिहिलं आहे की, गांधीजींचा असा विश्वास होता की, स्त्रिया शांती प्रिय असतात, त्या हिंसा आणि रक्तपात होऊ देऊ शकत नाहीत. महिला त्याग करू शकतात आणि लढूही शकतात.
मुंबई : भारत यंदा 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी योगदान दिलं. ब्रिटीशांविरोधातील या लढ्यात पुरुषांसोबत महिलांनीही खांद्याला खांदा लावून ब्रिटीशांशी दोन हात केला. महिलांनीही बंदूका हातात घेत ब्रिटीशांविरोधात लढा दिला. स्वातंत्र्यलढ्यात रसायन शास्त्राची एक विद्यार्थीनी देखील सामील होती, तिने क्रांतिकारकांना स्फोटकं बनवण्याचं प्रशिक्षण दिलं. महिलांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबाबत अधिक माहिती जाणून घ्या.
1930 हे वर्ष स्वातंत्र्यलढ्यातील महिलांच्या सहभागासाठी महत्त्वाचं वळण ठरलं असं वर्णन प्रसिद्ध सामाजिक शास्त्रज्ञ मानिनी चॅटर्जी यांनी एका लेखात केलं आहे. त्यांच्या मते, 1930 पूर्वी केवळ स्वातंत्र्यलढ्यात मोजक्याच महिलांचा सहभाग होता, पण 1930 पासून केवळ मोठ्या शहरांतूनच नव्हे, तर लहान शहरे आणि खेड्या-पाड्यांमधूनही महिला मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्यलढ्यात सामील झाल्या.
स्वातंत्र्यलढ्यात महिलांच्या सहभागामुळे वेगळं वळण
मानिनी चॅटर्जी यांनी लिहिलं आहे की, गांधीजींचा असा विश्वास होता की, स्त्रिया शांती प्रिय असतात, त्या हिंसा आणि रक्तपात होऊ देऊ शकत नाहीत. महिला त्याग करू शकतात आणि लढूही शकतात. स्त्रिया केवळ त्याग करू शकतात म्हणून किंवा त्यांना हिंसा आवडत नाही म्हणूनही त्यांना या लढ्यात सामील करुन घेतल्याने याचा मोठा परिणाम झाला आणि या लढ्याला महत्त्वाचं वळण मिळालं. 1930 च्या युद्धातही महिलांनी बंदुका उचलल्या होत्या. गांधींनी दांडी यात्रेला सुरुवात केल्यानंतर दोन आठवड्यांनंतर 18 एप्रिल 1930 रोजी चितगाव आरमोरी लूट (Chittagong Army Raid) झाली.
चितगाव बंड
18 एप्रिल 1930 रोजी, भारताचे महान क्रांतिकारक सूर्य सेन (Surya Sen) यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी आता बांगलादेशात असलेल्या चितगावमध्ये पोलीस आणि सहायक दलाच्या शस्त्रागारावर छापा टाकला आणि लुटलं. याला चितगाव आरमोरी रेड किंवा चितगाव बंड (Chittagong Uprising) असंही म्हटलं जातं.
या सर्व क्रांतिकारकांनी ब्रिटीश वसाहतवादी राजवटीपासून भारताला मुक्त करण्यासाठी सशस्त्र बंडाचं समर्थन केलं. या क्रांतीकारी गटात गणेश घोष, लोकनाथ बाळ, अंबिका चक्रवर्ती, हरिगोपाल बल (टेग्रा), अनंत सिंह, आनंद प्रसाद गुप्ता, त्रिपुरा सेन, बिधुभूषण भट्टाचार्य, हिमांशू सेन, बिनोद बिहारी चौधरी, सुबोध रॉय आणि मोनोरंजन भट्टाचार्य, प्रीतिलता वड्डेदार, प्रितिलता वड्डेदार यांचा समावेश होता. सहभागी होते.
स्वातंत्र्यलढ्यात सामील रसायनशास्त्राची विद्यार्थिनी
कल्पना दत्ता रसायनशास्त्राची विद्यार्थिनी होत्या. बंडात सामील होण्यासाठी, त्यांनी सुटकेसमध्ये ॲसिड आणले आणि गनकॉटन (एक प्रकरचे स्फोटक) आणि डायनामाइट बनविण्याचं प्रशिक्षण दिलं. नंतर त्यांनी स्वत:ला भूमिगत राहून स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतली. मात्र, भूमिगत होण्याआधी त्यांनी महिला आणि पुरुष दोघांनाही स्फोटकं तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं.
कल्पना दत्ता यांनी क्रांतिकारकांना डायनामाइट बनवणं शिकवलं
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान क्रांतिकारक प्रीतिलता वड्डादार, कल्पना दत्ता यांच्याकडून डायनामाइट बनवण्याचे प्रशिक्षण घ्यायच्या. प्रीतिलता वड्डेदार या साहित्याच्या विद्यार्थिनी होत्या. कल्पना यांच्यासोबत त्यांनी स्वत:लाही भूमिगत केलं. प्रीतिलता यांनी भूमिगत राहून सायनाइड पिऊन मृत्यूला कवटाळलं. पण त्या इंग्रजांपुढे झुकल्या नाहीत. या बंडात त्याचे अनेक साथीदारही मरण पावले. अशा प्रकारे 1930 च्या युद्धात भारतीय महिलांनी दोन प्रकारे स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पहिला पडद्यामागून आणि दुसरा थेट लढ्यात सामील होऊन.