India Pakistan War: भारतीय सैन्याने पाकिस्तानची किती लढाऊ विमानं पाडली, हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?
India Pakistan War:भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीनंतर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन ऑपरेश सिंदूर आणि त्यानंतर पाकिस्तानवर करण्यात आलेल्या हल्ल्यांबद्दल सविस्तर माहिती

Indian army press conference: भारताचं लष्कर, हवाईदल आणि नौदलाने रविवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूरची (Operation sindoor) आतापर्यंत समोर न आलेली कहाणी सांगितली होती. तसंच पुरावे सादर करत पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडला. भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानच्या बिळात लपलेले 100 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली होती. दहशतवाद्यांचे तळ कसे उद्ध्वस्त केले याचे पुरावेच सादर करण्यात आले. तसंच भारतानं केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक ठार झालेत तर भारताचे पाच जवान शहीद झाले आहेत. (India Pakistan War)
त्याचबरोबर, भारतीय वायूदलाने पाकिस्तानची काही लढाऊ विमानं देखील हाणून पाडली. भारताने पाकिस्तानची फायटर जेटस् पाडली पण ती भारताच्या हवाई हद्दीतच येऊ न दिल्यामुळे पुराव्यासाठी त्यांचे अवशेष उपलब्ध नसल्याचे एअर मार्शल ए.के. भारती यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे शस्त्रसंधीसाठी पाकिस्तानच्या डीजीएमओचा फोन कसा आला? 36 तासांचा अवधी असताना दोन तासांतच पाकिस्ताननं निरोप कसा दिला, याची सविस्तर माहितीच पत्रकार परिषदेत देण्यात आली.
8 मे रोजी पाकिस्तानचे अनेक ड्रोन्सनी भारताच्या लष्करी तळांवर हल्ला केला होता. हे सगळे हल्ले भारताने परतावून लावले. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यामुळे जमिनीवर भारताचे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, या हल्ल्यानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणे गरजेचे होते. हा हल्ला जलद आणि परिमाणकारक असणे गरजेचे होते. त्यानुसार, पश्चिम सीमेवरील पाकिस्तानच्या हवाई तळांवरील रडार सिस्टीम, कमांड सेंटरला लक्ष्य करण्यात आले. या माध्यमातून पाकिस्तानला हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असा संदेश देण्यात आल्याचे एअर मार्शल ए.के. भारती यांनी म्हटले.
पाकिस्तानने भारताचे राफेल विमान पाडले का?
पाकिस्तानने भारताचे राफेल विमान पाडल्याची चर्चा असून ते खरे आहे का, असा प्रश्न यावेळी एअर मार्शल ए.के. भारती यांना विचारण्यात आला. त्यावरही ए.के. भारती यांनी प्रतिक्रिया दिली. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आपण युद्धजन्य परिस्थितीत आहोत. नुकसान हा लढाईचा भाग असतो. भारताचे राफेल विमान पडले की नाही, असा प्रश्न विचारण्याऐवजी तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की, किंबहुना आम्हीही स्वत:ला विचारला पाहिजे की, आपण आपलं लक्ष्य साध्य केलं का? दहशतवादी तळ लक्ष्य करण्याचं आपलं उद्दिष्ट साध्य केलं का? तर याचं उत्तर निर्विवादपणे हो असे आहे. आपण अजूनही युद्धजन्य परिस्थितीत आहोत. मी त्यावर (राफेल विमानाबाबत) आता काही बोललो तर ते शत्रूला फायदा होऊ शकतो. आम्हाला त्यांना कोणताही फायदा किंवा आघाडी मिळून द्यायची नाही. मी इतकंच सांगेन की, आम्ही ठरवलेलं उद्दिष्ट आम्ही साध्य केलं. आपले सगळे पायलट सुखरुप माघारी परतले आहेत, असे एअर मार्शल ए.के. भारती यांनी सांगितले.
आणखी वाचा
























