India vs Pakistan War: भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला; पाकचा सच्चा मित्र म्हणून ओळख असणाऱ्या चीनचं मोठं विधान
India vs Pakistan War: भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईनंतर रशिया, जपानने भारताला पाठिंबा जाहीर केला होता.

India vs Pakistan War: पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये एलओसीवर रात्रभर जोरदार गोळीबार केला. त्याला भारतानेही (India Attacks on Pakistan) चोख प्रत्युत्तर दिलं. भारताने केलेल्या भडीमारात पाकिस्तानी चौक्या अक्षरशः भाजून निघाल्या. दक्षिण काश्मीरमधील पूंछ, राजौरी, सांबा सेक्टरमध्ये एलओसीवर पाकिस्तानचा रात्रभर तोफांचा भडीमार सुरू होता. तो अजूनही सुरूच आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतानेही तोडीस तोड उत्तर दिलं. पाकिस्तानातल्या 16 शहरांवर भारतानं जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवला. अनेक शहरांमध्ये ब्लॅक आऊट ठेवण्याची वेळ पाकड्यांवर आली.
भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईनंतर रशिया, जपानने भारताला पाठिंबा जाहीर केला होता. तसेच नेहमीप्रमाणे चीन पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला. भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानचा सच्चा मित्र म्हणून ओळखला जाणाऱ्या भारताने केलेली कारवाई दुदैवी असल्याचं चीननं म्हटलं होतं. 7 मे रोजी चीनने ही प्रतिक्रिया दिली होती. मात्र दोन दिवस उलटल्यानंतर चीनच्या राजदूताने एक नवीन ट्विट केलं आहे. चीनच्या या ट्विटमुळे पाकिस्तान चांगलाच संतापणार असल्याचं बोललं जात आहे.
चीनच्या राजदूतांनी काय म्हटलंय?
भारतातील चीनचे राजदूत झू फेईहोंग यांनी एक्सवर पोस्ट करत भारताचे कौतुक केले आहे. ईव्हीमध्ये चीन आघाडीवर आहे, तर भारत आयटी क्षेत्रात चमकत आहे. भारत आणि चीन हे दोन्ही देश अत्याधुनिक तंत्रज्ञानात प्रगती करत आहेत, एकत्रितपणे जागतिक प्रगतीला चालना देत आहेत, असं चीनच्या राजदूतांनी म्हटलं आहे. चीन हा पाकिस्तानचा चांगला मित्रदेश म्हणून ओळखला जातो. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणाव सुरु आहे आणि याचवेळी चीनने भारताचे कौतुक केले आहे.
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर चीनने काय म्हटलेलं?-
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेल्या परिस्थितीबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारताची आज सकाळी झालेली लष्करी कारवाई दुर्दैवी आहे. सद्यस्थितीबाबत आम्ही चिंतेत आहोत. भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी देश आहेत आणि चीनचेही शेजारी आहेत. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो. दोन्ही देशांनी शांतता आणि स्थैर्याच्या दृष्टीने विचार करावा, संयम बाळगावा, शांतता राखावी आणि परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल असे कोणतेही पाऊल उचलू नये, असे आम्ही दोघांनाही आवाहन करतो, असं चीनने म्हटलं आहे.
























