(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus : कोरोनानं धाकधूक वाढवली, देशात 129 दिवसांनी सर्वाधिक रुग्णांची नोंद
Covid19 in India : देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसनं डोकं वर काढलं आहे. 129 दिवसांनंतर रुग्णसंख्या हजारहून पुढे गेली आहे.
Coronavirus in India : देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्गामुळे चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 129 दिवसांनंतर देशात सर्वाधिक कोरोनाबाधित सापडले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत हजारहून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात 1071 नवीन रुग्ण सापडले असून यामध्ये सुमारे 200 हून अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळले आहेत.
129 दिवसांनी सर्वाधिक रुग्णांची नोंद
भारतात 129 दिवसांनंतर एका दिवसात 1,000 हून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहेत. सध्या देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 5,915 असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मागील 24 तासांत एकूण 1,071 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, केरळ आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 5,30,802 झाली आहे.
कोरोनासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्वे जारी
आरोग्य मंत्रालयाच्या नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे की, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि खोकला 5 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. गंभीर लक्षणे किंवा उच्च ताप असलेल्या रुग्णांच्या बाबतीत पाच दिवसांसाठी रेमडेसिव्हिर औषधं घेतलं जाऊ शकतं पण, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावं.
महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती काय?
दरम्यान, देशात नव्याने सापडलेल्या कोरोना रुग्णांपैकी 236 रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. राज्यात गेल्या 24 तासांत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सध्या 1308 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाकडून सर्व प्रकरणांवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचं काम सुरु आहे. केंद्र सरकारनेही राज्यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत.
देशातील कोरोना संसर्ग वाढताच
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना महामारीला सुरुवात झाल्यापासून कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,46,95,420 इतकी झाली आहे. एकूण रुग्णांपैकी सध्या 0.01 टक्के रुग्ण सक्रिय आहेत. कोविड-19 संसर्गातून बरे होण्याचे प्रमाण 98.8 टक्के नोंदवलं गेलं आहे. कोरोना संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्या 4,41,58,703 झाली आहे. तसेच, देशातील कोरोना मृत्यू दर 1.19 टक्के आहे. देशव्यापी कोरोना विषाणू लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत कोविड लसीचे 220.65 कोटी डोस देण्यात आले आहेत.
नव्या व्हेरियंटचा धोका
शास्त्रज्ञांच्या मते, गेल्या काही दिवसांत भारतातील कोरोना रुग्णांच्या वाढ झाल्याचं कारण कोविड-19 विषाणूचा XBB 1.16 हा सब-व्हेरियंट असू शकतो. व्हेरिएंटवर नजर ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या मते, शुक्रवारच्या आकडेवारीनुसार भारतात कोरोनाच्या XBB 1.16 प्रकाराची सर्वाधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत. ताज्या अहवालानुसार, XBB 1.16 सब-व्हेरियंटचे भारतात 48, सिंगापूर आणि यूएसमध्ये अनुक्रमे 14 आणि 15 प्रकरणे रुग्ण सापडले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :