India Coronavirus Cases : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच; गेल्या 24 तासांत 16906 नवे रुग्ण, 45 जणांचा मृत्यू
India Coronavirus Cases : देशात गेल्या 24 तासांत 15 हजार 447 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
India Coronavirus Cases : देशात कोरोनाच्या (Corona) आकडेवारीत सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळतच आहेत. असं असलं तरी धोका मात्र अद्याप टळलेला नाही. गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 906 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच, 45 कोरोना रुग्णांचा मृत्यू (Corona Death) झाला आहे.
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 15 हजार 447 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशातच गेल्या 24 तासांतील नव्या रुग्णांच्या संख्येमुळं सध्याच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1 लााख 32 हजार 457 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, संसर्गाचा दैनिक दर 3.68 टक्के आणि साप्ताहिक दर 4.26 टक्के आहे.
साथीच्या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,30,11,874 वर पोहोचली आहे. तर मृत्यू दर 1.20 टक्के नोंदवला गेला आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे 199.12 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत कोविडमुळे झालेल्या 45 मृत्यूंपैकी केरळमध्ये 17, महाराष्ट्रात 13, पश्चिम बंगालमध्ये पाच, गुजरात आणि बिहारमध्ये प्रत्येकी दोन, तर छत्तीसगड, दिल्ली, झारखंड, कर्नाटक, ओडिशा, पंजाबमध्ये प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
राज्यात मंगळवारी 2435 नव्या रुग्णांची नोंद तर 2882 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात आज 2435 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2882 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत सध्या 3318 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आज 13 कोरोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78, 42,090 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.93 टक्के इतकं झालं आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सोमवारी 659 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 96 हजार 508 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नसून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 624 झाली आहे. सध्या मुंबईत 3,318 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 420 रुग्णांमध्ये 395 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 1534 दिवसांवर गेला आहे.