Corona Updates: कोरोनानं धाकधूक वाढवली... देशात सलग दुसऱ्या दिवशी तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद
India Corona Updates: देशाता काल (गुरुवारी) देशात 3,095 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे.
India Corona Updates: पुन्हा एकदा कोरोनाच्या (Covid-19) वाढत्या रुग्णसंख्येनं धाकधूक वाढवली आहे. देशात कोरोनाचा संसर्ग दुप्पट वेगानं वाढत आहे. गेल्या आठवडाभरात नव्या रुग्णांची संख्या आता दुप्पट झाली आहे. आज म्हणजेच, गुरुवारी देशात 3,095 कोरोना बाधितांची (Coronavirus) नोंद करण्यात आली आहे. आज सलग दुसरा दिवस आहे, जेव्हा एका दिवसात नव्या रुग्णांची संख्या तीन हजारांच्या पुढे गेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये गोवा-गुजरातमधील प्रत्येकी एक आणि केरळमधील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 5.30 लाख लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 2.61 टक्के नोंदवण्यात आला आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 1.91 टक्के नोंदवण्यात आला आहे. देशात कोरोनाचे एकूण 4.47 कोटी रुग्ण आहेत.
#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) March 31, 2023
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/UWG2bUYaS4 pic.twitter.com/963EJEimXE
गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात तीन हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. जे गेल्या सहा महिन्यांत पहिल्यांदाच घडलं आहे. गेल्या आठवड्यापर्यंत देशात दररोज सरासरी 1,500 लोकांना कोरोना संसर्ग होत होता. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसात कोरोना व्हायरसच्या 3,016 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 2 ऑक्टोबर 2022 रोजी कोरोनाचे 3,375 रुग्ण आढळले होते. याशिवाय 1,396 रुग्ण कोरोमुक्त झाले आहेत. बुधवारी सक्रिय रुग्णांची संख्या 13,509 इतकी होती, जी आता 15,208 वर पोहोचली आहे.
राज्यातील परिस्थिती काय?
गेल्या 14 दिवसांत राज्यातल्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास तिप्पट झाली आहे. राज्यात 19 मार्च रोजी कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार 308 होती. ती रुग्णसंख्या काल दिवसभरात तीन हजार 16 वर पोहोचली. राज्यात दिवसभरात 694 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. याच कालावधीत मुंबईत 192 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. मुंबईत सध्या कोरोनाचे 846 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाची चौथी लाट ओसरल्यानंतर राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांनी तब्बल पाच महिन्यांनी अडीच हजाराचा आकडा पुन्हा ओलांडला. राज्यात प्रामुख्यानं मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचं दिसून येत आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये मिळून राज्यातील कोरोनाचे 80 टक्के सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत.
गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा आलेख घसरला होता पण, आता पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने वेग पकडला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच आठवड्यात देशातील कोरोना संसर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मंत्रालयाने राज्यांना कोविडचा सामना करण्यासाठी चार T म्हणजेच टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-टीकाकरण (लसीकरण) करण्याचा सल्ला दिला आहे. केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्वेही जारी केली आहेत.
घाबरू नका, खबरदारी बाळगा
कोरोनाता वाढता धोका पाहता गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगानं केलं आहे. तसेच सोशल डिस्टंसिग पाळा आणि शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. घाबरुन जाणू नका, तर खबरदारी घ्या, असा सल्ला आरोग्य विभागानं दिला आहे.