कोरोना आटोक्यात! देशात 24 तासांत 2500 नव्या रुग्णांची नोंद; सक्रिय रुग्णांमध्येही घट
India Corona Update : देशात 24 तासांत 2500 नव्या रुग्णांची नोंद झाली असून सक्रिय रुग्ण संख्येतही घट झाली आहे.
India Corona Update : भारतात (India) कोरोना व्हायरसचा (Covid-19) वेग आटोक्यात आल्याचं पाहायवा मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 2529 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कालच्या दैनंदिन रुग्णांच्या आकडेवारीनंतर देशातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांचा आकडा 4,46,04,463 वर पोहोचला आहे. तर, सध्या कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 32,282 इतकी आहे. कोरोनाबाधितांचा कालचा आकडा आणि आजच्या आकड्याची तुलना केली तर गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णांच्या संख्येत 1,036 ने घट झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गुरुवारी सकाळी 8 वाजता जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, काल दिवसभारत देशात कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झाला असून त्यानंतर मृतांची संख्या 5,28,745 वर पोहोचली आहे.
Single day rise of 2,529 new coronavirus infections push India's COVID-19 tally to 4,46,04,463, death toll climbs to 5,28,745: Govt
— Press Trust of India (@PTI_News) October 6, 2022
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 32,282 वर पोहोचली आहे. ही संख्या आतापर्यंत बाधित झालेल्या एकूण रुग्णांच्या 0.07 टक्के इतकी आहे. गेल्या 24 तासांत 1036 कोरोनाबाधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे देशात कोरोनामुक्तीचा दर 98.74 टक्क्यांवर पोहोचला आहे.
आकडेवारीनुसार, दैनंदिन संसर्गाचा दर 2.07 टक्के आणि साप्ताहिक संसर्ग दर 1.38 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत एकूण 4,40,43,436 लोक कोरोनामुक्त झाले आहेत आणि कोविड-19 मुळे मृत्यू होणाचा दर 1.19 टक्के इतका आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड-19 विरोधी लसींचे 218.84 कोटी डोस देण्यात आले आहेत.
बुधवारी, देशात 2468 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. ज्यामुळे कोरोना विषाणूच्या एकूण रुग्णांची संख्या 4,46,01,934 झाली, तर याच कालावधीत 17 लोकांचा मृत्यू झाला. बुधवारी सक्रिय रुग्णांची संख्या 33,318 नोंदवली गेली आहे. मंगळवारच्या तुलनेत सक्रिय रुग्णांमध्ये 1,280 नं घट झाली आहे. यापूर्वी मंगळवारी देशात कोरोनाचे एकूण 1968 नवे रुग्ण आढळले होते. तर या काळात 15 जणांचा मृत्यू झाला होता. महत्त्वाची बाब म्हणजे, यापूर्वी मे महिन्यात म्हणजे, 23 मे रोजी 24 तासांत 1675 नवीन रुग्ण आढळले होते. मंगळवारी अवघ्या 24 तासांत देशात 1528 रुग्णांची घट नोंदवण्यात आली होती.